भारताची विंडीजवर 80 धावांनी मात

March 20, 2011 4:23 PM0 commentsViews: 8

20 मार्च

वर्ल्ड कप स्पर्धेच्या निर्णायक लीग मॅचमध्ये भारताने विंडीजचा 80 रन्सनं पराभव केला आहे. या विजयाबरोबरच भारताने ग्रुप बीमध्ये दुसरा क्रमांकही पटकावला आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेच्या क्वार्टर फायनलचं चित्रही स्पष्ट झालंय. क्वार्टर फायनलमध्ये भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. विंडीजबरोबर आज झालेल्या मॅचमध्ये भारतानं पहिली बॅटिंग करत 268 रन्स केले.

विजयाचं लक्ष समोर ठेवून खेळणार्‍या वेस्टइंडीजची टीम 188 रन्सवर ऑलआऊट झाली. डेव्हेन स्मिथनं एकाकी झुंज देत 81 रन्स केले. पण भारताच्या भेदक बॉलिंगसमोर विंडीजचे इतर बॅट्समन मैदानावर फार काळ टिकू शकले नाहीत. भारतातर्फे झहीर खानने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. वर्ल्ड कपमध्ये आपली पहिलीच मॅच खेळणार्‍या आर अश्विननंही 2 विकेट घेतल्या. युवराज सिंगने 2 विकेट तर घेतल्याच पण शानदार सेंच्युरीही केली. त्याच जोरावर भारतानं पहिली बॅटिंग करत 268 रन्सचा टप्पा गाठला. विराट कोहलीनं 59 रन्स करत त्याला चांगली साथ दिली. वर्ल्ड कप स्पर्धेतील ही शेवटची लीग मॅच होती आणि आता 23 मार्चपासून क्वार्टरफायनलची धूम सुरु होईल.

क्वार्टर फायनलच्या पिचवर

या मॅचच्या निकालामुळे क्वार्टर फायनलचं चित्र स्पष्ट झालंय. ग्रुप बी मध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या नंबरवर तर भारत दुसर्‍या नंबरवर आहे. इंग्लंडने ग्रुप बीमध्ये तिसरा क्रमांक मिळवला तर भारताविरूद्धच्या पराभवामुळे वेस्ट इंडिज चौथ्या क्रमांकावर राहिलीय. ग्रुप ए मध्ये पाकिस्तान अव्वल क्रमांकावर आहे तर श्रीलंका दुसर्‍या क्रमांकावर आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलिया तिसर्‍या क्रमांकवर तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे.

म्हणजेच क्वार्टर फायनलमध्ये आता दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला असणार आहे ए ग्रुप मधील चौथ्या क्रमांकाच्या न्युझीलंड टीमशी तर भारताची क्वार्टर फायनलची लढत असणार आहे ती गतविजेत्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी. तसेच इंग्लंडचा मुकाबला श्रीलंकेशी असणार आहे. आणि चौथी क्वार्टर फायनल मॅच असणार आहे ती ग्रुप ए मधील अव्वल असलेल्या पाकिस्तान आणि ग्रुप बी मधील तळाच्या टीमशी म्हणजेच वेस्ट इंडिजशी होणार आहे.

close