जस्टीस फॉर मोनिका; नागपूरकर गप्प का?

March 21, 2011 4:31 PM0 commentsViews: 11

21 मार्च

नागपूरमध्ये 11 मार्च ला केडीके कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला शिकणार्‍या मोनिका किरणापुरे या विद्यार्थीनीचा भरदिवसा खून झाला. आज सोमवारी या घटनेला अकरा दिवस उलटून गेले असले तरी पोलिसांना मोनिकाच्या मारेकर्‍यांना पकडण्यात यश आलं नाही. त्यामुळे नागपूरमध्ये विलक्षण संतापाचं वातावरण निर्माण झालंय.

11 मार्चला मोनिका हॉस्टेलमधून कॉलेजला जात होती. त्यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी चॉपरचे वार करुन तिची हत्या केली. पोलीस आणि क्राईम ब्रँचच्या 7 टीम्स मिळूनही मोनिकाच्या मारेकर्‍यांचा शोध लावण्यात यश मिळवू शकलेल्या नाहीत. ही घटना पाहिलेले अनेकजण आहेत. पण त्याविषयी माहिती द्यायला मात्र कोणीही तयार नाही. त्यामुळेच दोन आठवडे उलटून गेले तरीही मोनिकाचे मारेकरी कोण आहेत याबद्दल पोलिसांना काहीही माहिती मिळत नाही. आता मोनिकाचे आई वडील स्वतःच नागपूरकरांना पुढं येण्याचे आवाहन करत आहे. नागपूरकरांच्या मनात नेमकी कशाची दहशत आहे, ते यासंदर्भात काहीही बोलायला का तयार नाहीयेत असा प्रश्नही आता विचारला जातोय. दरम्यान, या प्रकरणामध्ये नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर एस. बुराडे यांची बदली करण्यात आली आहे. पण आरोपी मात्र अजूनही मोकाट आहेत.

मोनिकाचं यश

मोनिका ही केडीके कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसर्‍या वर्षात शिकत होती. ती अतिशय हुशार होती, नुकताच तिने विद्यापीठाच्या परीक्षेत पहिला नंबर पटकावला होता. मोनिकाचे वडील हे रामटेकला प्रयोगशाळा सहाय्यक आहेत आणि आई गृहिणी आहे. मोनिकाला एक लहान बहीण आहे. ती अकरावीत शिकतेय.

आई-वडिलांचं आवाहन

मोनिकाचे आई-वडील मोनिकाची हत्या जिथे झाली त्याठिकाणी गेले. त्यांनी अक्षरशः तिथल्या लोकांपुढे हात पसरले आणि मोनिकाच्या मारेकर्‍यांची माहिती देण्याची हाक दिली. त्यांचे अश्रू पाहून नंदनवन भागातल्या अनेकांच्या भावना अनावर झाल्या. पण साक्षीदार काही मिळाला नाही.आज मोनिकाच्या आई-वडिलांच्या भेटीनं ही घटना ताजी झाली. परीक्षेत पहिला नंबर मिळवल्याची बातमी आनंदानं आई-वडिलांना सांगत असतानाच तिच्यावर हल्ला झाला. आणि तिचा फोन बंद झाला. त्यानंतर तिच्या आई वडिलांपर्यंत पोहचली ती मोनिकाच्या मृत्यूचीच बातमी. ओक्साबोक्शी रडतच आपल्या मुलीवर जो प्रसंग आला तो इतर कुणावर येऊ नये म्हणून तरी लोकांनी पुढं येण्याचे आवाहन मोनिकाच्या आईवडिलांनी लोकांना केलं.

घटनाक्रम

11 मार्च – कॉलेजला जाताना सकाळी 10.30 वाजता मोनिकाची हत्या 12 मार्च – पोलिसांनी विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली13 मार्च – विद्यार्थ्यांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा, कँडल लाईट मार्च काढला 14 मार्च – पोलिसांना मोनिकाच्या मोबाईलची सिम कार्ड्स मिळाली 15 मार्च – पोलीस आणि क्राईम ब्रँचच्या 7 टीम्सनी लोकांना माहितीचं आवाहन केलं 16 मार्च – माहिती देण्यासाठी कुणीच पुढे आलं नाही 17 मार्च – पोलीस आयुक्तांची कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी चर्चा 18 मार्च – विद्यार्थी आणि राजकीय पक्षांच्या स्टुडंट्स विंगकडून निदर्शनं 19 मार्च – कोणतीच नवी माहिती मिळाली नाही 20 मार्च – नंदनवन पोलीस स्टेशनच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या बदलीचे आदेश 21 मार्च – पोलीस इन्स्पेक्टरची बदली, मोनिकाच्या पालकांचं लोकांना आवाहन

आयबीएन-लोकमतचे प्रश्न

- 11 दिवसानंतरही पोलिसांना एकही साक्षीदार कसा मिळाला नाही ?- गुन्हेगारांनी वापरलेली हत्यारं, मोटारसायकल यांचं काय झालं ?- घटनेच्या 4-5 दिवसांपूर्वी मोनिकाचं कॉलेजच्या एका मुलाशी भांडण झालं होतं त्या मुलाचा शोध अजून कसा लागला नाही ?- मोनिकाचे दोन सिम कार्ड्स सापडूनही त्याचे कॉल रेकॉर्ड्स पोलिसांना मिळाले काय ?- मोनिकाच्या रुममेट्स कडून काही माहिती मिळाली काय ? – पोलीस इन्स्पेक्टरची बदली का करण्यात आली ?- हे पोलिसांचं अपयश आहे काय ?

close