मुंबईपेक्षाही पुण्यातील प्रश्न जास्त गंभीर बनतील – राज ठाकरे

March 23, 2011 11:09 AM0 commentsViews: 9

23 मार्च

पुण्याच्या नागरी प्रश्नाबाबत आज बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे मनपा आयुक्तांबरोबर चर्चा केली. पुणे शहरात वाढत्या पसार्‍याबरोबरच अत्यावश्यक सोयी पुरवणे मनपाला अशक्य होऊन बसलंय. त्यामुळे अनेक ठिकाणी बकालपणा वाढत आहे. पुण्याच्या यासारख्याचं अनेक प्रश्नांवर राज यांनी आयुक्तांची भेट घेऊन विकासप्रश्नी मनसेची भूमिका जाहीर केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंबईपेक्षाही पुण्यातील प्रश्न जास्त गंभीर बनत जातील असंही राज यांनी सांगितलं. त्यासाठीच पुणेकरांनी पूर्ण सत्ता मनसेच्या हातात द्यावी असं राजकीय आवाहनही त्यांनी केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त महेश झगडे यांची भेट घेऊन पुण्यातील नागरी प्रश्नांवर चर्चा केली. पुण्याच्या समस्या मनसे सोडवेल पण त्याकरता महानगरपालिकेत पूर्ण सत्ता पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. पण तोपर्यंत पुणे महापालिकेचं नेतृत्व टग्याकडे आहे त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा असा मिश्कील टोला त्यांनी नाव न घेता अजित पवारांना लगावला.

पुणे महापालिकेत मनसेचे 9 नगरसेवक निवडून आल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच महानगरपालिकेत आले. आयुक्त महेश झगडे यांच्याशी सुमारे अर्धा तास त्यांनी पुण्याच्या नागरी समस्यांवर चर्चा केली. नंतर पुण्याच्या बिकट होत चाललेल्या समस्यांवरून सत्ताधार्‍यांना चिमटे काढत मनसेला पूर्ण सत्ता द्या पुणे सुधारू असे आवाहनही केलं.

निवडणुकामधील सत्तासमीकरणं, रणनिती यावरच्या प्रश्नांना टाळत त्यांनी नागरी समस्यावरच बोलणं पसंत केलं पण नरेंद्र मोदी गुजरात मध्ये जे करू शकतात ते आपल्या राज्यात का घडू शकत नाही असं म्हणत पुन्हा एकदा भाजप प्रेम दाखवलं आणि आणि अजित पवारांना टोलाही लगावला.

पुण्यात सुरेश कलमाडींवरच्या कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपामुळे काँग्रेसला मरगळ आली. शह कटशहच्या राजकारणामुळे सेना भाजप युतीचे संबंध ताणले गेलेत त्यामुळे राष्ट्रवादीचा सुसाट सुटलेला वारू मनसे रोखणार का हे 10 महिन्यांनी होणार्‍या महापालिकेच्या निवडणुकांनंतरच स्पष्ट होणार आहे.

close