प्रेमी युगुलांना धमकावून अश्लील चित्रण करणारी टोळी गजाआड

March 24, 2011 1:53 PM0 commentsViews: 8

24 मार्च

बागेत बसलेल्या प्रेमी युगुलाला शरीर संबंध करण्यासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी सहा तरुणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये आयआरबी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड परिसरातल्या हिंजवडी इथल्या एका बागेत एक तरुण-तरुणी एकांतात बसले होते. त्यावेळी तिथं अचानक आलेल्या समाजकंटकांनी त्यांना मारहाण करायला सुरूवात केली. आणि त्यांना शरीरसंबंध करण्यासाठी जबरदस्ती केली. तसं केलं नाही तर त्यांना जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. धमकीला घाबरुन हे तरुण – तरुणी हतबल झाले आणि ते म्हणतील तसं करु लागले. या सगळ्या प्रकरणाचे चित्रीकरण करून त्याचा अश्लील एमएमएस बनवण्यात आला. आणि तो पद्धतशीरपणे सगळीकडे पसरवण्यात आला.

काही दिवसांपूर्वी हाच एमएमएस पोलिसांना मिळाला. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी या टोळीपैकी चौघांना अटक केली. शैलेश मदगुले, नवनाथ टेळे, मोहन कदमआणि रामदास वटाणे अशी या अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. यांच्यापैकी टेळे आणि कदम हे आयआरबी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. या चौघांवर विनयभंग करणे, मारहाण करणे, अश्लील कृत्य करायला भाग पाडणे, त्याचं चित्रीकरण करणे या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील आणखी तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहे. एमएमएस बनवणारी ही टोळी दोन वर्षांपासून कार्यरत आहे. या टोळीने बनवलेल्या दोन एमएमएसचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. दरम्यान या सहाजणांना पिंपरी कोर्टात हजर करण्यात आलं आणि 26 तारखेपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

close