बजेटमध्ये पक्षपातीपणा ? विरोधकांचा आरोप

March 26, 2011 3:12 PM0 commentsViews:

आशिष जाधव, मुंबई

26 मार्च

विधानसभेत अर्थसंकल्पात गोंधळ घालणार्‍या 9 आमदारांच्या निलंबनावरून निर्माण झालेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. बजेटच्या निधी वाटपावरून काँग्रेस आणि विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेरले आहे. त्यामुळे अजितदादांना कोंडीत पकडून पुरवण्या मागण्यामध्ये आपला वाटा वाढवून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि विरोधकांनी सुरू केला आहे.

विरोधक आणि काँग्रेस नेत्यांबरोबर राष्ट्रवादीतील काही सहकारी मंत्री सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज झाले आहेत. थोडक्यात काय दादागिरीच्या नादात अजित दादांची बजेटमधल्या पक्षपातीपणामुळे चांगलीच कोंडी झाली आहे. खरंच अजितदादांचा बजेटमधील पक्षपातीपणा स्पष्ट दिसतोय. साडे एक्केचाळीस हजार कोटी रूपयांच्या बजेटमधील जवळ-जवळ 60 टक्के निधी अजितदादांनी राष्ट्रवादीच्या खात्यांकडे ठेवला आहे. कृषी विभागाला 649 कोटी रूपयांची तरतूद दाखवली पण त्यातील 600 कोटी रूपये केंद्र सरकारकडून येत आहेत. म्हणजे प्रत्यक्षात कृषी विभागाला बजेटमधून केवळ 49 कोटी रूपये मिळणार आहेत. असाच प्रकार इतर बाबतीतही झाला आहे.

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बजेटमध्ये पाच कोटी रूपयांची कामं मागितली होती. पण त्यांच्यासह बहूतेक काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांच्या मतदार संघांना बजेटमधून निधी मिळालेला नाही. यामुळे काँग्रेसमध्ये हळूहळू नाराजी व्यक्त होत आहे. अजितदादांच्या बजेटवरची काँग्रेसची नाराजी चांगलीच चर्चेत आलीय. त्यावरून विरोधकही अजित दादांना डिवचत आहे. अजित दादांवरील नाराजीमुळे काँग्रेसचे नेते 9 आमदारांच्या निलंबनाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीची कोंडी करू पाहत आहेत. अजित पवारांच्या दादागिरीचा विषय आता टगेगिरीवर जाऊन पोहोचला आहे. त्याचा फायदा काँग्रेसचे नेतेच उचलण्याचा प्रयत्न करतायेत अशीही चर्चा आहे.

दरम्यान अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधकांनी केलेला गोंधळ हा प्री प्लान होता. वाचन चालू असताना पोस्टर्स कसे आले असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे.

close