दे घुमा के…..

March 29, 2011 4:16 PM0 commentsViews: 9

30 मार्च30 मार्च 2011 रोजी वर्ल्ड कपमधील सर्वात चुरशीची आणि महत्वाची मॅच रंगणार आहे. भारत पाकिस्तान दरम्यानची ही सेमीफायनल प्रत्येक खेळाडूसाठी करो या मरोची मॅच आहे. आतापर्यंत वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडिया पाकबरोबरच्या अपराजित राहिली आहे. त्यामुळे तो रेकॉर्ड कायम राखण्याचा टीम इंडियाने निर्धार केला आहे. तर हा इतिहास बदलण्यासाठी पाकिस्तानही आता सज्ज झाला आहे.

भारत – पाकिस्तान दरम्यानच्या सेमी फायनल मॅचची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. या मॅचमध्ये जी टीम विजेती ठरेल ती टीम दुसर्‍यांदा वर्ल्ड कप पटकवण्यासाठी तयारी करेल. भारतीय कॅप्टनलाही या मॅचचं महत्त्व माहित आहे. आणि क्रिकेटवरच लक्ष केंदि्रत करायचा सल्ला त्यानं टीमला दिला आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरूद्ध टीम इंडिया आत्तापर्यंत फेव्हरेट आहे. वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत दोन्ही टीम चारवेळा आमने सामने आले आहेत आणि चारही वेळा भारताने विजय मिळवला आहे. 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान शेवटचे आमने सामने आले होते. पण हा इतिहास बदलण्यासाठी पाकिस्तान टीम सज्ज झाली आहे. आणि हीच योग्य वेळ असल्याचे पाक कॅप्टन आफ्रिदीने स्पष्ट केलंय.

शोएब अख्तरला खेळवायचे की नाही हा निर्णय सध्या पाक मॅनेजमेंटसाठी महत्त्वाचा असणार आहे. गेल्या दोन मॅचेसमध्ये शोएब खेळला नाही. आणि त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह अजून कायम आहे. पण भारताविरूद्धचा त्याचा अनुभव लक्षात घेता त्याला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.

तर भारतालाही मुनाफ पटेल आणि आशिष नेहरा यांच्यामध्ये एकाची निवड करावी लागेल. पण शेवटी प्रत्यक्ष मैदानावर जी टीम चांगली कामगिरी करेल तीच टीम फायनलमध्ये पोहचेल.

मोहालीला कडेकोट बंदोबस्त

बुधवारच्या मॅचसाठी मोहालीत सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे. पंजाबमध्ये हजारो पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. मोहालीत लष्करी जवानांबरोबरच बॉम्ब शोधक पथक सज्ज आहेत. स्टेडियमच्या परिसरात राहणार्‍या लोकांना जाण्या-येण्यासाठी पास देण्यात आले आहेत.

तसेच या परिसरातला ट्रॅफिक दुसरीकडे वळवण्यात आलंय. अंबाला एअरपोर्टवर लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर्सही सज्ज आहेत. सर्व हॉस्पिटल्सना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व परिसरात नो फ्लाय झोन जारी करण्यात आला आहे.

मोहालीत मीडियावर बंदी

आयसीसीने मात्र मॅचचं कव्हरेज करणार्‍या मीडियाला नाराज केलं आहे. भारत-पाक सेमीफायनलपूर्वी आयसीसीने सर्वच न्यूज चॅनेल्सचे ऍक्रेडिशन रद्द केले आहे. याचाच अर्थ इलेक्ट्रॉनिक मीडियाला वर्ल्ड कपच्या सेमी फायनल आणि फायनलच्या मॅचचं रिपोटीर्ंग करता येणार नाही. न्यूज चॅनेल्सच्या प्रतिनिधींना स्टेडियममध्ये प्रवेश करायला मनाई करण्यात आली आहे.

मॅचपूर्वी आणि मॅचनंतरच्या पत्रकार परिषदाही त्यांना कव्हर करता येणार नाहीत. टीम्सच्या ट्रेनिंग सेशनदरम्यान मीडियाला तिथं जायला बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीच्या या निर्णयावर केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्णयाचा फेरविचार करावा असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांना केलं आहे.

हॉटेलच्या बिलाच्या मागेही रुपया ऐवजी रन्स लिहिले जातात !

अमरावतीच्या बडनेरा रोडवरच्या राजासाहेब हॉटेलला क्रिकेट ग्राऊंडच स्वरुप आलंय. या हॉटेलमध्ये क्रिकेट पीच तयार करण्यात आली आहे. येथील प्रत्येक खाद्यपदार्थाला क्रिकेटरचं नाव देण्यात आलंय. प्रत्येक देशाचा झेंडाही या हॉटेलमध्ये लावण्यात आला आहे. इतकंच नाही तर प्रत्येक वेटरला क्रिकेटरच शर्ट देण्यात आला आहे. इथं बिलाच्या मागेही रुपया ऐवजी रन्स लिहिले जात आहे. इथं येणार्‍या प्रत्येक क्रिकेटप्रेमीला 10% सूटही मिळणार आहे.

close