श्रीलंकेचा दिमाखात फायनलमध्ये प्रवेश

March 29, 2011 5:29 PM0 commentsViews: 7

29 मार्च

वर्ल्ड कप 2011 ची फायनल गाठणारी श्रीलंका ही पहिली टीम ठरली आहे. आज मंगळवारी झालेल्या सेमीफायनलमध्ये श्रीलंकेनं न्यूझीलंडचा 5 विकेटने पराभव केला आणि फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तुफान फॉर्मात असलेला तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा एकदा श्रीलंकेच्या विजयाचे हिरो ठरले आहे.

न्यूझीलंडने श्रीलंकेसमोर विजयासाठी 218 रन्सचं माफक आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 5 विकेट आणि 2 ओव्हर राखून पार केलं. ओपनिंगला आलेल्या तिलकरत्ने दिलशानने 73 रन्सची मॅचविनिंग खेळी केली. तर कॅप्टन कुमार संगकाराने 54 रन्स केले.अँजेलो मॅथ्युज आणि समरवीराने अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत लंकेच्या विजयावर शिक्कमोर्तब केलं.

तर श्रीलंकेसाठी फॅक्टर एम पुन्हा प्रभावी ठरला. लसिथ मलिंगा आणि अजंथा मेंडिसनं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर मुथय्या मुरलीधरनला 2 विकेट घेण्यात यश आलं.आता भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या विजेत्या टीमशी श्रीलंका 2 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे मैदानावर फायनल मॅच खेळेल.

फायनल गाठण्याची लंकेची ही तिसरी वेळ

1996 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेनं पहिल्यांदा फायनल गाठली आणि ऑस्ट्रेलियाचा 7 विकेट राखून पराभव करत वर्ल्ड चॅम्पियन टीम बनली. यानंतर 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केला. पण ऑस्ट्रेलियाने पराभवाचा वचपा काढला.

लंकेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आणि आता तिसर्‍यांदा श्रीलंकेने फायनल गाठली. आणि आताचा फॉर्म बघता लंकेची टीम जेतेपदासाठी दावेदार मानली जात आहे.

हा विजय जादुगार मुरलीधरनला

वर्ल्ड कप सेमीफायनलमधील हा विजय श्रीलंकेच्या टीमने फिरकीचा जादूगार मुथय्या मुरलीधरनला समर्पित केला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत मुथय्या मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होतोय. आणि घरच्या मैदानावर मुरलीधरनची ही अखेरची वन डे मॅच ठरली आहे.

श्रीलंकेनं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला असला, तरी मुरलीधरनची जादूई बॉलिंग पाहण्याची लंकन प्रेक्षकांची ही अखेरची संधी होती. आणि मुरलीनंही आपल्या चाहत्यांना निराश केलं नाही. घरच्या मैदानावरुन त्यानं एक्झिट घेतली तीही विकेट घेतच अखेरच्या ओव्हरमध्ये अखेरच्या बॉलवर त्याने स्कॉट स्टायरिसची महत्वाची विकेट घेतली.

न्यूझीलंडची इनिंग संपल्यानंतर मुरलीच्या सहकार्‍यांनी त्याचं अभिनंदन केलं. तर स्टेडियममधील प्रेक्षकांनीही त्याला उभं राहून मानवंदना दिली. मुरलीनं या सर्वांचे आभार मानले.

close