लोकपाल विधेयकासाठी अण्णाचं बेमुदत उपोषण

April 4, 2011 4:56 PM0 commentsViews: 4

04 एप्रिल

केंद्र सरकारने लोकपाल विधेयक मांडावे आणि ते लवकरात लवकर मंजूर करावे या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी आता आपली मोहीम तीव्र केली. यासाठी आज सोमवारी ते दिल्लीत दाखल झाले. दिल्ली एअरपोर्टवर अण्णांचं जोरदार स्वागत झालं. लोकपाल विधेयकासाठी अण्णा उद्यापासून जंतरमंतरजवळ बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. विधेयक मंजूर झाल्याशिवाय महाराष्ट्रात परतणार नाही असा निर्धार अण्णांनी व्यक्त केला.

अण्णा हजारे, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. देशात घोटाळे वाढतायत, टू जी स्पेक्ट्रमसारख्या घोटाळ्याची शरद पवारांसारख्या नेत्याला माहितीच नव्हती काय असा सवालही अण्णा हजारेंनी केला. दरम्यान अण्णांनी उपोषणाला बसू नये असं आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं. याप्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अण्णांना फोन केला. पण चर्चेला आता खूप उशीर झाल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.

लोकपाल विधेयक हे देशासाठी दुसरा वर्ल्ड कप जिंकण्यासारखंच आहे असं सांगत किरण बेदी यांनी यावेळी अण्णा हजारेंना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तर अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीमध्ये निषेधाच्या काळ्या गुढ्या उभारण्यात आल्या. लोकपाल विधेयकाची मागणी करण्यासाठी अण्णांना उपोषण करावे लागत आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी राळेगणसिद्धीतल्या घरांवर काळ्या गुढ्या उभारण्यात आल्या.

close