टिंग्याची माळरानावरची "शिवाई"

April 5, 2011 3:29 PM0 commentsViews: 11

05 एप्रिल

मेंढरामागे भटकंती…माळरानावरचं पालाचं घर…हेच होतं त्याचं जीवन…पण तो होता 2007 सालचा सर्वोत्कृष्ठ बालकलाकाराचा पुरस्कार पटकावणारा टिंग्या अर्थात शरद गोयेकर. पुरस्कार मिळाला पण घर नव्हतं. टिंग्याची हीच व्यथा आयबीएन लोकमतने जगासमोर मांडली. आणि आता गोयेकरांचा ''शिवाई'' थाटात उभा आहे, तो दानशूरांचं ऋण मान्य करत.

याण – अहमदनगर हायवेवरच्या आळेफाट्याजवळच्या राजुरी गावच्या माळरानावरच पाल. याच पालातं एक संसार कसाबसा चालला होता. आणि इथच राहत होता चितंग्या बैलावर जीवापाड प्रेम करणारा टिंग्या. अर्थात मंगेश हाडवळेच्या टिंग्या सिनेमातला शरद गोयेकर. टिंग्याने शरदला जवळपास 50 च्या वर पुरस्कार मिळवून दिले. पण हे पुरस्कारही टिंग्याच्या कुटुंबासह पालावरच उघडयावर होते. याच वेळी त्याला सर्वोत्कृष्ठ बालकलाकाराचा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला. पण तो घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात जाणार्‍या टिंग्याला हक्काचे घर नाही हे वास्तव आयबीएन लोकमतने जगासमोर आणले.

त्यावेळी नेमकी निवडणुकीची आचारसंहिता सुरू होती. त्यामुळे कुणीही मदत करत नव्हतं. पण गोयेकर कुटुंबाची ही परिस्थिती पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुढाकार घेतला. आणि टिंग्याला घर बांधून देण्याची जबाबदारीही. आणि मग अनेक मदतीचे हात पुढे आले. सरकारलाही जाग आली. त्यांनी गोयेकरांच्या घरासाठी 2 गुंठ्यंाची जागाही दिली. 11 डिसेंबर 2009 ला मग टिंग्याच्या घराचे भूमिपूजन झालं. आणि 22 मे 2010 ला टिंग्यासह त्याच्या घरच्यांनी थाटात शिवाई या त्यंाच्या हक्काच्या घरात गृहप्रवेशही केला.

जिथं 2 वर्षापूर्वी एक माळरानावरचं पालं होतं, तिथं आता टुमदार बंगली उभी राहिली. आणि तीही फक्त 8 महिन्यात. आपल्या या घरात टिंग्या आज घरच्यांसह सुखानं राहतोय. आयबीएन लोकमतच्या सततच्या पाठपुराव्याचंच हे यश आहे. आणि याच घरात आता शिकून मोठेपणी कलेक्टर होण्याचे स्वप्न शरद गोयेकर पाहतोय.

close