अण्णांच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता !

April 6, 2011 4:37 PM0 commentsViews: 2

06 एप्रिल

लोकपाल विधेयकासाठी उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. दिल्लीत जाऊनही अण्णांनाी शरद पवारांवर टीका करायचे सोडलेलं नाही. त्यामुळे अण्णांचे उपोषण लोकपाल विधेयकासाठी आहे की शरद पवारांच्या विरोधात असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

अण्णांनी शरद पवारांना लक्ष्य करणं महाराष्ट्राला नवीन नाही. पण अण्णा आता दिल्लीत जंतरमंतरवर आहेत. त्यांचं आंदोलन लोकपाल विधेयकाचा केंद्र सरकारने जो मसुदा बनवलाय त्याच्या विरोधात आहे. पण आता याहीपुढे जाऊन त्यांनी मसुदा समितीच्या एकाच सदस्यावर म्हणजे शरद पवारांवर टीका केली. अण्णांच्या आंदोलनाला हे वळण बघताच शरद पवारांनीही आपण मसुदा कमिटीतून बाहेर पडायला तयार आहोत, असं सांगितलं.

पवारांनी नरमाईची भूमिका घेतली पण राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र अण्णांवर पलटवार केला. अण्णांच्या आरोपामुळे ज्यांना एकेकाळी मंत्रिपद गमवावे लागले त्या नवाब मलिक यांनीही अण्णा सरकारला आदेश देऊ पाहत आहे अशी टीका केली. अण्णांवर फक्त टीकाच होतेय अस नाही तर दिलजमाईचे प्रयत्नही होत आहेत. विनायक मेटंेचं आणि अण्णांचं चांगलं जमतं. त्यामुळे अण्णांच्या उपोषणात मेटेंनी मध्यस्थाची भूमिका घेतली.

यापूर्वी अण्णांनी शरद पवारांना लवासा प्रकरणात जेरीला आणलं होतं. शिवाय भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नवाब मलिक आणि सुरेश जैन या दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला पवारांना भाग पाडलं होतं. त्यात अण्णा विरुद्द पवार या संघर्षाचा हा पुढचा अंक आहे. आणि दिल्लीच्या रंगमंचावर तो सुरू झाल्याने हा संघर्ष आणखीनच व्यापक झाला आहे.

close