शेतकरी कामगार पक्षाने ‘कात टाकली’

April 7, 2011 1:15 PM0 commentsViews: 133

07 एप्रिल

शेतकरी कामगार पक्षाने राज्यभरातील शेतकर्‍यांच्या काही मागण्यांसाठी मंत्रालयावर विराट मोर्चा काढला. या मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने शेकापक्षाने राज्यात विशेषत: विदर्भात पक्षविस्ताराच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

एकेकाळी मुंबईत हुकमी गर्दी जमवणार्‍या डाव्या पक्षांचा जोर गेल्या काही वर्षात मुंबईतून ओसरला होता. पण गुरूवारी शेतकरी कामगार पक्षाने हजारोंच्या संख्येनं गर्दी जमवत डाव्या पक्षांना आपल्या जुन्या ताकदीची आठवण करून दिली. शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि असंघटित कामगारांच्या समस्या आणि प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेकापक्षाने या विराट मोर्चाचे आयोजन आझाद मैदानावर केलं होतं. या मोर्चाने प्रामुख्याने विदर्भातील शेतकर्‍यांच्या समस्या आणि प्रश्नांवर जोर देण्यात आला.

एकेकाळी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात शेतकरी कामगार पक्षाचा मोठा प्रभाव होता. शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेली कापूस एकाधिकार योजना तसेच पुनर्वसन धोरणातील साडेबारा टक्के भूखंडाचा लाभ अशा अनेक योजना या पक्षाने राज्याला मिळवून दिल्या.

1990 पर्यंत विरोधी पक्षनेतेपद भुषवलेल्या या पक्षाचे विधानसभेत फक्त चार आमदार आहेत. हा पक्ष राज्यात पुन्हा आपला जनाधार शोधण्याचा प्रयत्न करतोय. 2014 च्या विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेऊन शेकापक्षाने विदर्भात पक्ष संघटक नेमायला सुरूवात केली. विदर्भानंतर उर्वरित महाराष्ट्रातही पक्ष विस्ताराची योजना हातात घेतली जाणारे आहेत. आणि आता फक्त रायगड आणि सोलापूर जिल्ह्यापुरता मर्यादित झालेल्या या पक्षाने आपल अस्तित्व टिकवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

close