अण्णांना सोनियांचं साकडं !

April 7, 2011 2:03 PM0 commentsViews: 3

07 एप्रिल

आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अण्णांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. अण्णांनी उपस्थित केलेले मुद्दे खरोखरच लोकांच्या चिंतेचे आहेत. भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या बाबतीत दुमत असू शकत नाही असं सोनियांनी म्हटलंय. यासाठीचे कायदे प्रभावी आणि परिणामकारक हवेत, असंही सोनियांनी म्हटलंय. सरकार या मुद्द्यांकडे लक्ष देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पण अण्णांनी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन सोनियांनी केलं. तर अण्णांनी लोकपाल विधेयक मंजुर करा सरकारकडे आग्रह धरण्याचं सोनियांना आवाहन केलंय.

अण्णांच्या आंदोलनला आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान आज केंद्र सरकारने आंदोलकांबरोबर चर्चा सुरु केली आहेत. आज गुरूवारी चर्चेच्या दोन फेरी झाल्या. लोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीत सामान्य नागरिकांचा, समावेश करायला सरकारने तयारी दाखवली आहे.

पण इतर मागण्या मात्र सरकारने मान्य केलेल्या नाहीत. या समितीबाबत अधिसूचना काढायला सरकारने नकार दिला आहे. तसेच या समितीच्या अध्यक्षस्थानी प्रणव मुखर्जी असतील असा सरकारचा प्रस्ताव आहे. तर आंदोलकांना अण्णा हजारेंना अध्यक्ष करावे अशी मागणी आहे. तसेच मसुदा तयार करण्यासाठी कुठलीही कालमर्यादा घालायला केंद्र सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे या मतभेदांच्या मुद्यांवर उद्या पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान अण्णांनी आपलं उपोषण सुरुचं ठेवण्याचा निर्धार केला आहे.