कॅरमपटू प्रकाश शिवछत्रपती पुरस्कारपासून वंचित

April 7, 2011 4:09 PM0 commentsViews: 5

संदीप चव्हाण , मुंबई

07 एप्रिल

क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या धामधुमीमुळे इतर खेळांकडे तसं दुर्लक्षच झालं होतं. कॅरम खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर तिरंगा फडकावणार्‍या प्रकाश गायकवाडला नियमांचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे शिवछत्रपती पुरस्कारापासून वंचित राहवे लागले आहेत.

कॅरम हा असा खेळ आहे ज्यात महाराष्ट्राच्या खेळाडंूनी राष्ट्रीयचं नव्हे तर जागतिक पातळीवर आपला दबदबा कायम राखला आहे. पुण्याच्या प्रकाश गायकवाड या कॅरमपटूने आपल्या कर्तुत्वाने कॅरमचं अवघं जग जिंकलं. श्रीलंकेत झालेल्या आय.सी.एफ. कप आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तर प्रकाशनं एकेरी दुहेरी आणि सांघिक अशा तिन्ही गटात बाजी मारत विजेतेपदाची हॅट्‌ट्रीक साधली.

त्यानंतरच्या सार्क स्पर्धेतही त्याने सांघिक गटात विजेतपद पटकावलं. कॅरमची वर्ल्डचॅम्पियन्सशिप जिंकणार्‍या भारतीय टीमचाही तो सदस्य होता. त्याच्या या यशस्वी कामगिरीसाठी राष्ट्रपतींनी त्याची पाठ थोपटली. पण महाराष्टाच्या क्रीडा खात्याकडून त्याची उपेक्षाच झाली.

प्रकाश राष्ट्रीय स्पर्धेत एलआयसीचे प्रतिनिधीत्व करतो, पण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने नियमानुसार थेट पुरस्कारासाठी पात्र होता. यापूर्वीही पंजाब नॅशनल बँकेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या जगन बेंगळेला त्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीसाठी शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

याआधीही महाराष्ट्राच्या क्रीडा खात्याने चुकांची दुरस्ती करून खेळाडूंचा नव्याने पुरस्कारांच्या यादीत समावेश केला. प्रकाशलाही त्याच्या हकाच्या कौतुकाचा वाटा मिळावा हीच अपेक्षा.

close