नवे लोकनायक अण्णा हजारे !

April 9, 2011 5:37 AM0 commentsViews: 6

9 एप्रिल, दिल्ली

जनशक्तीपुढे अखेर सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि अण्णा हजारे नवे लोकनायक ठरले. सरकारने लोकपाल विधेयकाची अधिसूचना काढल्यानंतर लोकनायक अण्णा हजारे यांनी आपलं उपोषण पाचव्या दिवशी संपवलं.

केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी अण्णांचे सहकारी स्वामी अग्निवेश यांच्याकडे पत्र सोपवलं होतं. लोकपाल विधेयकासंदर्भातली अधिसूचना या पत्रात आहे. हे पत्र पाहिल्यानंतरच अण्णांनी उपोषण सोडलं. दिल्लीच्या जंतरंमंतर इथंं हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत त्यांनी लिंबू सरबत घेऊन. पण लढा सुरूच राहणार असल्याचे संकेतही दिले. हा जनतेचा विजय असल्याचा पुनरुच्चार अण्णांनी यावेळेस केला. हे आंदोलन राष्ट्रव्यापी झालं.आंदोलनाला जिथून पाठिंबा मिळाला, त्या राज्यांचा दौरा करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं.

लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी कार्यकर्त्यांसह सुरू केलेल्या आंदोलनाला यश आलंय. या आंदोलनाला संपूर्ण देशातल्या विविध स्तरातून पाठींबा देत जनता रस्त्यावर उतरली होती. या जनशक्तीपुढे नमतं घेत अखेर सरकारनं अण्णा हजारेंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. मसुदा समितीचे दोन अध्यक्ष असतील. यात सहअध्यक्ष शांती भूषण हे असतील. तर समितीमध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांचा समावेश असेल. त्याचबरोबर सरकार हे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचंही सरकारनं मान्य केलंय. जर पावसाळी सत्रात हे बिल पारित झालं नाही तर 15 ऑगस्टला सारा देश लाल किल्ल्यावर जमा होईल असा इशाराही अण्णांनी दिलाय.

जनतेच्या भावनांचा आदर केल्याबद्दल अग्निवेश यांनी सोनिया गांधी, पंतप्रधान आणि युपीए सरकारचे आभार मानले. हा जनतेचा सगळ्यांत मोठा विजय असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलीये. तसंच हा माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण आहे असं अण्णांनी उपोषण सोडण्या अगोदर सांगितलं.

अण्णांच्या राळेगण सिद्धीसह देशभरातल्या आंदोलकांमध्ये विजयोत्सवाचं वातावरण आहे.

close