मुंबई इंडियन्स करणार दिल्ली डेअरडेव्हिल्सशी दोन हात

April 10, 2011 10:27 AM0 commentsViews: 6

10 एप्रिल

शेन वॉर्नच्या राजस्थाननं आयपीएलच्या चौथ्या हंगामात एकदम रॉयल सुरुवात केली. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये राजस्थानने डेक्कन चार्जर्सचा तब्बल 8 विकेट राखून पराभव केला. तर आजच्या लढतीसाठी मुंबई इंडियन्सही सज्ज झाली आहेत. चौथ्या हंगामात मुंबई टीमचं एकच लक्ष्य आहे ते म्हणजे जेतेपद पटकावण्याचं.

दुनिया हिला देंगे हम! हा टीमचा नारा कायम आहे. पण नीट बघितलं तर यावेळी हा नारा देणारे काही खेळाडू बदलले आहेत. झहीर खान ऐवजी मुनाफ पटेल टीममध्ये आला आहे. तर ओपनिंगला तेंडुलकरच्या साथीला शिखर धवन ऐवजी डेव्ही जेकब्स असेल. शिवाय मिडल ऑर्डरमध्ये रोहीत शर्मा आणि अँड्र्यू सायमंड्स ताफ्यात दाखल झालेत.

लसिथ मलिंगा, दिलहारा फर्नांडो आणि हरभजन सिंग यांच्यामुळे बॉलिंग तर मजबूत आहेच. थोडक्यात खेळाडू बदलले तरी बदली खेळाडूही त्याच क्षमतेचे आहेत. लसिथ मलिंगा आणि झहीर यांनी सुरुवातीच्या ओव्हरमध्ये कशी बॉलिंग करायची याचा आदर्श गेल्यावर्षी घालून दिला होता. झहीरच्या अनुपस्थितीत ती जबाबदारी आता मुनाफला पार पाडावी लागेल.

बॅटिंगमध्ये मात्र टीमची ताकद गेल्यावर्षी होती तशीच आहे. उलट सायमंड्स आणि रोहीत शर्मा टीममध्ये आल्यामुळे ती वाढलीच आहे. कायरन पोलार्डला गेल्यावर्षी फारशी चमक दाखवता आली नव्हती. पण मोठे शॉट्स खेळण्याची त्याची क्षमता बघता तो महत्त्वाचा मॅचविनर असणारच. कॅप्टन सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप विजयामुळे ताजातवाना झाला असेल. आणि गेल्यावर्षी फायनलमध्ये हुकलेली संधी यावर्षी काबीज करायची या निर्धारानेच 37 वर्षांचा हा नौजवान खेळाडू मैदानात उतरेल हे नक्की.

मुंबई टीमची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे चार मोठे खेळाडू जसे त्यांनी कायम राखले तसेच स्थानिक खेळाडूही त्यांनी फारसे बदलले नाही. धवल कुलकर्णी, अली मुर्तझा आणि आदित्य तरेही मागची चार वर्षं या टीममध्ये आहेत. त्यामुळे लिलाव नव्याने झाला असला तरी मुंबईचा चेहरा फारसा बदलेला नाही. आणि हीच या टीमची खरी ताकद आहे.

close