मसुदा समितीवरून आमच्यात मतभेद नाहीत – अण्णा हजारे

April 10, 2011 4:06 PM0 commentsViews: 2

10 एप्रिल

देशव्यापी जनआंदोलन यशस्वी झाल्यानंतर सगळीकडेच जल्लोष अजून सुरूच असताना अचानक रविवारी या आंदोलनाला वादाचं गालबोट लागलं. जनलोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीत भूषण पिता-पुत्रांच्या निवडीवर योगगुरु रामदेव बाबा यांनी टीका केली. पण यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण मसुदा समितीवरुन कोणतेही मतभेद नाहीत असं सांगत अण्णांनी या वादावर पडदा टाकला. बाबा रामदेव यांनी गैरसमजातून असं वक्तव्य केलं होतं असंही अण्णांनी स्पष्ट केलं. तसेच या समितीमध्ये किरण बेदी यांना का घेण्यात आलं नाही यावरही अण्णा हजारे आणि किरण बेदी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट उत्तर देत सारे वाद निरर्थक असल्याचं स्पष्ट केलं.

तसेच समितीतल्या प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे विचार वेगवेगळे असू शकतात, पण आमच्या सर्वांचं उद्दीष्ट मात्र एकच आहे. त्यामुळे काही मतभेद असलेच तरी आम्ही एकत्र बसून त्यातून मार्ग काढू असं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय. यावेळी समितीच्या सदस्यांना आपली मालमत्ता जाहीर करण्यात कुठलाही आक्षेप नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.तर अनुपम खेर यांच्यावर दाखल झालेला हक्कभंगाचा प्रस्ताव चुकीचा असल्याचंही यावेळी केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

व्यक्ती नाही तर हा प्रवृत्तीविरुद्धचा लढा आहे – अण्णा

याच पत्रकार परिषदेत जनतेच्या दबावामुळेच लोकपाल बिल आणलं जातंय. त्यामुळे ड्राफ्टींगच्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे हे लोकांपर्यंत पोहचायला हवं अशी मागणीही यावेळ अण्णांनी केली. शरद पवारांच्या समितीतल्या सहभागावर टीका केली होती. त्याबद्दल प्रश्न विचारला असता 'व्यक्ती नाही. तर हा प्रवृत्तीविरुद्धचा लढा आहे,' असं अण्णांनी सांगितलं. तर अण्णांनी नरेंद्र मोदी आणि नीतीशकुमार यांच्या चांगल्या कामांचं कौतुकही केलं.

close