तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रचाराची सांगता

April 11, 2011 5:03 PM0 commentsViews: 15

11 एप्रिल

केरळ आणि तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचाराचा शेवट झाला. केरळमध्ये 140 जागांसाठी 13 तारखेला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 971 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आणि डाव्या आघाडीने केलेल्या आरोप-प्रत्यारोपाने केरळमधील प्रचार गाजला. मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांच्यावर काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला होता.

सत्ताधारी एलडीएफ म्हणजेच लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट पुन्हा सत्तेत आल्यास राज्याला 93 वर्षांचे मुख्यमंत्री मिळतील असा टोला त्यांनी प्रचारात लगावला होता. त्यावर अच्युतानंदन यांनीही प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांनी अमूल बेबीज म्हटलं. त्यावर अच्युतानंदन यांचं विधान म्हणजे देशातील तरुणांचा अपमान असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. तामिळनाडूमध्येही आज निवडणुकीचा प्रचार संपला. येथे 13 तारखेला विधानसभेच्या 234 जागांसाठी मतदान होणार आहे. द्रमुकचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एम करुणानिधी, अण्णाद्रमुकच्या अध्यक्षा जयललिता, करुणानिधींचा मुलगा एम. के. स्टॅलिन आणि द्रमुकचे संस्थापक विजयकांत हे दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावरून जयललिता आणि विजयकांत यांनी करुणानिधींवर कडाडून हल्ला केला. तर करुणानिधी यांनी आपल्या प्रचारात विकासाचा मुद्दा मांडला.

close