जैतापूर प्रकल्प विरोधात शिवसेनेची आक्रमक भूमिका

April 12, 2011 10:21 AM0 commentsViews: 3

विनोद तळेकर,मुंबई

12 एप्रिल

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या जैतापूर दौर्‍यानंतर या प्रकरणी शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. आणि या प्रकरणी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे. विधिमंडळातही या प्रकरणाचे पडसाद उमटले.

नुकतीच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जैतापूरला भेट दिली. या दौर्‍यात प्रकल्पग्रस्तांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा शिवसेनेनं केला. सोमवारी विधानसभेतही गटनेते सुभाष देसाई यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे जैतापूर प्रकल्पग्रस्तांबाबत चर्चा करण्याची मागणी केली. पण अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ती फेटाळली.

प्रकल्पाला होणारा स्थानिकांचा विरोध पाहता शिवसेनेनं हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. याच योजनेचा एक भाग म्हणून शिवसेनेच्या आमदारांचा एक गट जैतापूर मुक्कामी जाणार आहे. या गटामार्फत या भागात चौकसभा आणि प्रकल्पग्रस्तांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातून पृथ्वीराज चव्हाण यांनी जैतापूर प्रकल्पाला मंजुरी मिळवली त्यावेळी त्यांचं कौतुकही झालं. पण आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत हा प्रकल्प सुरू करणं हे एक मोठं आव्हान मुख्यमंत्र्यांना पेलावं लागेल.

close