नाशिकमध्ये अनधिकृत बांधकामांना महापालिकेचं अभय

November 9, 2008 8:19 AM0 commentsViews: 3

9 नोव्हेंबर, नागपूरगेल्या पाच वर्षात नाशिकमधून लोकशाही दिनात दाखल झालेल्या सर्वाधिक तक्रारी आहेत अनधिकृत बांधकामाच्या. अनधिकृत बांधकाम होवू नयेत, झालेल्यांवर कारवाई व्हावी यासाठी बरेच कायदे झाले. प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे. त्यासाठी थेट महापालिकेचे अधिकारीच बिल्डर्स सोबत हात मिळवणी करतात. नाशिकमधल्या अशाच एका अनधिकृत बांधकामाविरुद्ध लढणार्‍या आमच्या सिटिझन जर्नालिस्टचा हा रिपोर्ट. नाशिकच्या तुकाराम यशवंत तपकिरेंनी सर्वसामान्यांप्रमाणे चांगल्या घराचं एक स्वप्न पाहिलं. दोन वर्षांपूर्वी मधुबन कॉलनीत ' सायली प्लाझा ' तला प्लॅट बुक केला. 771 रुपये भावानं डील झालं. 10 हजार रुपये रोख आणि 50 हजारांचा चेकही बिल्डरनं स्वीकारला. पण प्रत्यक्षात बांधकाम सुरू झाल्यावर बिल्डर जास्त पैशांची मागणी करू लागला. नंतर बिल्डरनं फोन करून सांगितलं तुमचा एरिया वाढतो आहे. यावर तपकिरेंनी सांगितलं की हा एरिया नगरपालिकेच्या प्लॅनमध्ये असेल तर मी घ्यायला तयार आहे. पण प्रत्यक्षात तो प्लॅनमध्ये नाही. बिल्डरनं सांगितलं की अनधिकृत बांधकामाविषयी काळजी करू नका. नगरपालिकेत आपले खूप लोक आहेत. आतापर्यंत मी 15-16 बिल्डींग बांधल्या आहेत. प्रत्येकीत थोड्या फार प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे. ते कुठे महापालिकेनं तोडलं. तुम्ही काळजी करू नका. प्रत्यक्ष साइटवर जाऊन पाहिल्यावरही या गैरव्यवहाराला पुष्टी मिळते.या प्रकरणात तपकिरे यांनी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीत तक्रार केली. महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली जिल्हाधिकार्‍यांकडेही लोकशाही दिनाच्या दिवशी तक्रार केली. एवढंच नाही तर विभागीय महसूल आयुक्तांकडे तक्रार केली. पण आजपर्यंत प्रतिसाद शून्य !आज नाशिक शहरात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्यांना घरं घेणं कठीण झालं आहे. त्यात असे हे बिल्डर महापालिकेच्या अधिकार्‍यांना हाताशी घेवून लोकांना फसवत आहेत.

close