‘आदर्श’ वर हातोडा 27 एप्रिलनंतर

April 13, 2011 4:47 PM0 commentsViews: 9

13 एप्रिल, मुंबई

अखेर आदर्श घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायमूर्ती जे ए पाटील आणि माजी मुख्य सचिव पी सुब्रमण्यम यांच्या न्यायालयीन आयोगानं सुरू केली. आदर्श पाडण्याच्या नोटीसीला मुंबई हायकोर्टाने 27 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. तर त्यातच आदर्शमध्ये कन्हैयालाल गिडवाणी यांचे सहा फ्लॅट आहेत, असं इन्कम टॅक्सच्या अहवालात स्पष्ट झालंय. त्यांच्या नावावर एक तर त्यांच्या मुलांच्या नावावर दोन फ्लॅटस आहेत. तर तीन फ्लॅट बेनामी असल्याचे अहवालात म्हटलंय.

आयोगाने आदर्शची संपूर्ण इमारत, आवार तसेच सोसायटीने गिळकृत केलेल्या प्रकाश पेठे मार्गाची पाहणी केली. या वेळी आदर्श सोसायटीला वेगवेगळ्या परवानग्या देणार्‍या संबंधित 11 विभांगाचे प्रतिनिधीसुद्धा हजर होते. या पाहणीच्या वेळी सोसायटीच्या विरोधात काही लष्करी आणि राज्य सेवेतल्या अधिकार्‍यांनी जाणिवपूर्वक कारस्थान रचल्याचा आरोप एका सदस्याने केला.

दुसरीकडे, आदर्श पाडण्याच्या पर्यावरण खात्याच्या नोटीसला आव्हान देणार्‍या याचिकेवरील अंतिम सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 27 एप्रिलला अंतिम सुनावणी घेण्याचे मुंबई हायकोर्टाने निश्चित केलंय. त्यामुळे आदर्श सोसयटीला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पदाधिकार्‍यांनी कितीही दावा केला तरी, हायकोर्ट, न्यायालयीन आयोग आणि सीबीआयच्या तावडीतून सुटणं आदर्शसाठी कठीण होऊन बसलंय, हेच खरं.

दरम्यान, आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी आणखीही काही धक्कादायक खुलासे उघड झाले आहे.

- कन्हैयालाल गिडवाणी यांचे 6 फ्लॅट असल्याचं उघड – गिडवाणी यांच्या नावे 1, मुलांच्या नावे 2 तर 3 फ्लॅट बेनामी – गिडवाणी यांना बिल्डर जयंत शहाकडून 30 लाख रु., जय महाकॉन्स प्रा. लि. 18 लाख रु. मिळाले – गिडवाणींचा मुलगा कैलासला जयंत शहाकडून 23 लाख रु., जय महाकॉन्सकडून 17 लाख रु. मिळाले- गिडवाणींचा दुसरा मुलगा अमितला जयंत शहाकडून 27 लाख रु., जय महाकॉन्सकडून 11 लाख 45 हजार रु. मिळाले – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या सासू भगवती शर्मांच्या फ्लॅटसाठी माजी अधिकारी एस. एस. बर्वेंनी 65 लाख 5 हजार रु. दिले- अशोक चव्हाण यांचे नातेवाईक मदनलाल शर्मांना जयंत शहांचा मुलगा मालवकडून 70 लाख 51 हजार रु. मिळाले – आदर्शमधील बांधकामांसाठी 103 पैकी 3 सदस्यांनी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली- बाबासाहेब कुपेकर, आयएफसीअधिकारी देवयानी खोब्रागडे, निवृत्त मेजर जनरल टी. के. कौल यांचा समावेश

close