मोदींच्या कौतुकामुळे मेधा पाटकर नाराज

April 13, 2011 6:28 PM0 commentsViews: 4

13 एप्रिल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विकासकामांबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्यावरूनवाद सुरू झाला आहे. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधी लढणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि अरुणा रॉय यांनी मोदींबद्दल अण्णांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. अण्णांचं वक्तव्य धक्कादायक आणि दुदैर्वी असल्याचं म्हटलंय. आणि स्वीकारता येण्यासारखं नसल्याचं मेधा पाटकर यांनी स्पष्ट केलंय. गेल्या 6 वर्षांत आपल्या राज्यात ज्यांनी लोकायुक्ताची नियुक्ती केली नाही, अशा नरेंद्र मोदींची अण्णा प्रशंसा करतात, हे चुकीचं असल्याचं मेधा पाटकर यांनी म्हटलंय.

मेधा पाटकर म्हणतात

'आमच्या सर्वांकडून पाठिंबा मिळाल्यानंतर अण्णा हजारेंनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ग्रामविकासाच्या कामाचं जाहीर कौतुक करणं धक्कादायक आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलायाचं झाल्यास, मोदींची भ्रष्टाचारविरोधी भूमिका केवळ राजकीय हेतूनं प्रेरीत आहे. जन लोकपाल विधेयकाला मोदींचा पाठिंबा असेल, तर मग गुजरातमध्ये 2005 पासून लोकायुक्ताची जागा रिकामी कशी आहे?' – मेधा पाटकर

दरम्यान अण्णा हजारेंनी या वादावर एक निवेदन प्रसिद्ध केलंय. आणि सर्वांना एक होण्याचं आवाहन केलं आहे.

अण्णांचं आवाहन

'काही जण आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला एकजूट व्हायला हवं, जेणेकरून आम्ही अशा शक्तींचा पराभव करू शकू आणि भ्रष्टाचारविरोधातली आपली मोहीम कायम ठेवू शकू.' – अण्णा हजारे

close