पुण्यात गावाचा ‘आनंद’ देण्यार्‍या मेळाव्याचे आयोजन

April 16, 2011 11:06 AM0 commentsViews: 13

16 एप्रिल

बहुरुपी, गोंधळी, नंदिवाला, लोहार, पाथरवट, वासुदेव खेड्यांमध्ये नेहमीच दिसणारी ही सगळी लोक. शहरातल्या लोकांना मात्र या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत नाहीत. गावगाडा चालतो तरी कसा ? पूर्वीची गावं असायची तरी कशी याचा अनुभव घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. 22 एप्रिल ते 8 मेच्या दरम्यान पुण्यामध्ये आनंद मेळावा भरणार आहे.

अकलुजच्या सयाजीराजे पार्क तर्फे या आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या आनंदमेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण जनजीवन अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुण्यातल्या सिंहगडच्या पायथ्याशी असणार्‍या डोणजे जवळ या मेळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेत जयसिंग मोहिते पाटील यांनी ही माहिती दिली.

साधारण 27 एकरांमध्ये 125 उंबर्‍याचे एक गावच सिंहगडाच्या पायथ्याशी उभारण्यात आलं आहे. या गावामध्येच या मेळाव्याच्या माध्यमातुन तब्बल 90 वेगवेगळे ग्रामीण कलाप्रकार तसेच 'गड आला पण सिंह गेला' ही लघुनाटिका ही पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरच फिरता सिनेमा, बुरगुंडा,तमाशा अशा ग्रामीण लोककलाही या मध्ये सादर केल्या जाणार आहेत. आत्तापर्यंत अकलुजला दरवर्षी आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात यायचं. यंदा पहिल्यांदाच पुण्यामध्ये या मेळ्याचे आयोजन करण्यात आलंय.

close