जलसंपत्ती विधेयकावरून आघाडीत वादाचा भडका ?

April 18, 2011 1:12 PM0 commentsViews: 5

18 एप्रिल

जलसंपदा नियमन विधेयकावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वादाचा भडका उडणार हे निश्चित आहे. रात्री दीड वाजता हे विधेयक मंजूर करून घेण्याचा अट्टाहास सरकारने आणि विशेषत: राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दाखवला होता. आज राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे दिलं जावं अशी मागणी केली आहे.

या विधेयकाला काँग्रेसमधून आता हळूहळू विरोधाला सुरूवात झाली होती. त्याचवेळी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या समितीकडे हे विधेयक न्यावं अशी मागणी आपण करणार असल्याचे सांगितलं. कुठलं ही विधेयक सभागृहात आणले जात असताना ते अगोदर कॅबिनेटमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच आणलं जातं.

त्यामुळे काँग्रेसला काही आक्षेप असतील तर हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवावे अशी मागणी आव्हाड आणि इतर काही राष्ट्रवादी आमदार करणार आहेत. आव्हाड यांच्या मागणीमागे राष्ट्रवादी पक्ष अप्रत्यक्षरीत्या उभा असल्याचंही चित्र आहे. दरम्यान काँग्रेसमधील विदर्भातील नेत्यांचा गट या विधेयकाच्या विरोधात आहे.

अमरावती जिल्ह्यातल्या सोफीया प्रकल्पाला पाणी देण्यासाठी हे विधेयक आणलं जातंय असं त्यांचं म्हणणं आहे. पण, या सोफीया प्रकल्पात ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत ते बघता काँग्रेसचे नेते त्यांची मागणी किती लावून धरतील ही सुद्धा शंकाच आहे अशी विधिमंडळात चर्चा आहे. काही काँग्रेस नेत्यांचे हितसंबंधच ह्यात गुंतले असल्यामुळे राष्ट्रवादीने आव्हाड यांच्या मागणीतून ही नवी चाल खेळल्याचं म्हटलं जातंय.

close