सावकरी पाशाच्या विरोधात लढणारी तेजस्विनी !

April 18, 2011 5:31 PM0 commentsViews: 1

अलका धुपकर, बुलढाणा

18 एप्रिल

एकीकडे सरकारनं दिलेल्या मदतीत भ्रष्टाचार होतोय तर दुसरीकडे सरकारी सावकारी पाशात अडकला आहे. काँग्रेसचे आमदार दिलीप गोकुलचंद सानंदा यांचे वडिल आणि सानंदा परिवार यांचा बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय होता. प्रसारमाध्यमांनी याविषयीच्या अन्यायाच्या कहाण्यांना वाचा फोडल्यानंतर आमदार सानंदा यांच्या कुटुंबाने सावकारीचा व्यवसाय बंद केला. पण ही सावकारी आता बंद करण्यात आली असली तरीही याआधी त्यांनी अनेक गोरगरीब शेतकर्‍यांची शेती सक्तीची खरेदी खत करुन विकत घेतली. सावकारीवर नियंत्रण ठेवणारा नवा कायदा येत नाही तोपर्यंत या शेतकर्‍यांच्या अन्यायाला अंतिम दाद मिळणारही नाही.

बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात पिंप्री गवळी गावात आम्ही पोहचलो. एका धीट महिलेला भेटण्यासाठी. उषा फुंडकर यांना. सानंदा परिवाराच्या सावकारीविरोधी तिनं जंग छेडली आहे. तिचे एफआयआर अखेर पोलिसांना नोंदवून घ्यावे लागले आहेत. आणि सहाय्यक निबंधकांकडून तिच्या तिन्ही तक्रारींची चौकशीही सुरु झाली आहे. एक लाखाच्या कर्जापोटी सानंदा परिवारातल्या तिघांनी तिच्या 16 एकर जमिनीवर कब्जा केला आहेत.

मोडक्या तोडक्या घरात तिची चूल पेटते. पण आसर्‍यासाठी तिची मुलं आणि ती शेजार्‍यांच्या घरी राहतात. घरं पुन्हा उभं करायचं आणि गमावलेल्या शेतीचे मालक बनायचे हा निर्धार तिच्या तरुण मुलाने पक्का केला. उषा फुंडकर यांच्याप्रमाणेच त्यांच्या जावेची अडीच एकर जमीनही 10 हजार रुपयांसाठी रवी सानंदा यांनी बळकावली.

उषाने नवर्‍याच्या मृत्यूनंतर चूल मूल सांभाळली. पण आता सानंदा परिवाराच्या या दोन पिढ्यांच्या छळाविरोधात ती थेट राष्ट्रपतींपर्यंत पोहचली. 15 मार्चला राष्ट्रपतींच्या घेतलेल्या भेटीनंतर लक्ष्मण सानंदाविरोधातील तिच्या केसची सुनावणीही सुरु झाली. आपलं आयुष्य अन्याय सोसण्यात गेलं. पण पुढच्या पिढीला तरी सावकारीच्या पाशातून सोडवायचं हेच उषा फुंडकरचं ध्येय आहे.

close