आहे दम तर लढा मैदानात

April 29, 2011 5:02 PM0 commentsViews: 10

21 एप्रिल

ग्रामीण खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आता लोकमतनं पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राच्या मातीतल्या अस्सल खेळांचा जगभरात प्रसार व्हावा यासाठी 'ग्रामीण खेळ' या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबादमध्ये येत्या 23 आणि 24 तारखेला ही स्पर्धा रंगणार आहे.

आहे दम तर लढा मैदानात असं आव्हान देत युवा वर्गाला ग्रामीण खेळांकडे आकर्षित करण्याचा एक अनोखा उपक्रम लोकमतनं हाती घेतला आहे. महाराष्ट्रातल्या मातीतले आठ खेळ आणि त्या खेळांची आराधना करणारे राज्यभरातील खेळाडू आणि हजारो क्रीडाप्रेमींचा जल्लोष येत्या 23 आणि 24 एप्रिलला औरंगाबादमध्ये रंगणार आहे. औरंगाबादच्या खुलताबाद इथल्या भद्रा मारुती मंदिर मैदानावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.

या स्पर्धेत कुस्ती, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, रस्सीखेच आणि पंजा लढत अशा आठ खेळांचा समावेश आहे. पुरुष आणि महिलांच्या 24 टीम्स यात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे नावाजलेले खेळाडू आणि या खेळाडूंना घडवणार्‍या प्रशिक्षकांंची उपस्थिती स्पर्धेचं प्रमुख आकर्षण असेल.

या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा पर्यटन ही नवी संकल्पनाही राबवण्यात आली आहे. या मागचा उद्देश एकच महाराष्ट्राच्या मातीतले हे खेळ जगाच्या पर्यटन नकाशावर आणण्याचा. ग्रामीण खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा लोकमतचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.

close