नाईट रायडर्सवर बंगलोरचा ‘रॉयल’ विजय

April 22, 2011 3:27 PM0 commentsViews: 7

22 एप्रिल

आयपीएलच्या चौथ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची टीम अखेर विजयाच्या मार्गावर आली. स्पर्धेत सलग तीन पराभवानंतर बंगलोरने विजय मिळवला आणि बंगलोरच्या मदतीला धावून आला तो वेस्टइंडिजचा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेल. गेलनं केलेल्या सेंच्युरीच्या जोरावर बंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सचा 9 विकेट आणि 11 बॉल राखून पराभव केला आहे.

पहिली बॅटिंग करणार्‍या नाईट रायडर्सने 5 विकेट गमावत 171 रन्स केले. कॅलिस, गंभीर आणि युसुफने फटकेबाजी करत बंगलोरसमोर तगडं आव्हान उभं केलं. पण यंदाच्या आयपीएलमध्ये आपली पहिलीच मॅच खेळणार्‍या ख्रिस गेलच्या धडाक्यापुढे हे आव्हान बंगलोरनं सहज पार केलं. गेल 102 रन्सवर नॉटआऊट राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 6 व्या मॅचमधील हा दुसरा विजय ठरला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा हा तिसरा पराभव ठरला आहे.

आयपीएलच्या चौथ्या हंगामात पहिलीच मॅच खेळणार्‍या धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेलनं शानदार सेंच्युरी ठोकली. विशेष म्हणजे आयपीएलच्या चौथ्या हंगामात ख्रिस गेलवर कोणत्याही टीम मालकाने बोली लावली नव्हती. गेल्या तीन हंगामात ज्या टीमकडून गेल खेळला त्या कोलकाता नाईट रायडर्सनंही गेलकडे दुर्लक्ष केलं.

पण बंगलोर रॉयलने दुखापतग्रस्त डर्क नॅनेसऐवजी ख्रिस गेलला टीममध्ये संधी दिली. आणि गेलनंही आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. आपल्या धडाकेबाज बॅटिंगने त्यानं बंगलोरला शानदार विजय मिळवून दिला. नाईट रायडर्सला आपल्या बॅटचा दणका देत गेलनं आपली निवड न केल्याची चूक किती महागात पडली हे दाखवून दिलं. ख्रिस गेलनं अवघ्या 55 बॉलमध्ये नॉटआऊट 102 रन्स केले. आपल्या या खेळीत गेलनं तब्बल 7 सिक्स आणि 10 फोरची बरसात केली.

close