येशू इस्त्रायलला घेऊन जाणार सांगून फादरने लाटल्या आदिवासींच्या जमिनी !

April 22, 2011 5:48 PM0 commentsViews: 19

अमेय तिरोडकर, मुंबई

22 एप्रिल

अशिक्षित आदिवासींना फसवण्याचा एक प्रकार ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्यात घडला. तुम्हाला येशू घेऊन जाणार आहे, असं सांगून काही तथाकथितधर्मगुरूंनी त्यांना फसवल्याची ही घटना आहे. पण, यात याहीपेक्षा गंभीर म्हणजे या आदिवासींनी या तथाकथित धर्मगुरूच्या बोलण्याला भुलून आपल्या जमिनी आणि वाहनं विकल्याचाही आरोप होतोय. दरम्यान या प्रकरणात धार्मिक भावना भडकवल्याच्या आरोपाखाली एक फादर आणि त्याच्या पाच सहकार्‍यांना अटक झाली आहे.

देवखोप या ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्यात एकच पळापळ सुरू होती. एक पुरूष एका बेशुद्ध महीलेला खांद्यावर उचलून घेऊन जातोय तर एक मुलगा आपल्या आईशी भांडतोय तर कोणी आपल्याच घरातल्या बाईला ती बेशुद्ध असतानाच पळवून नेतोय. तर कुठे आपल्याच आईला एक मुलगा अडवतोय.

या प्रकारमागच्या गोंधळाला जबाबदार होता तो एक भोंदू फादर. ज्याने इस्त्रायलला येशूकडे जायचं आहे असं सांगून अनेक आदिवासींना खोटनाटं बोलून फसवलं गेलंय. सुनंदा दडस इस्त्रायलला येशूकडे जायला स्वत:च्या घरी न सांगता निघाली होती. पण, येथील या शिबिरात ती तिच्या दीराला अशी बेशुद्ध असताना सापडली.

सुनंदासारख्या अनेकांना इथं येणार्‍या फादरनं फसवल्याचा आरोप होतोय. 21 एप्रिलला तुम्हाला येशू इस्त्रायलला घेऊन जाईल. त्यासाठी व्हीसा, पासपोर्ट वगैरे काही नको तोच तुमची व्यवस्था करेल असं या फादरनं सांगितलं. येताना फक्त अंगावरचे कपडे ठेवा बाकी सगळं इथंच सोडा असा सल्लाही या फादरनं दिला. पालघर तालुक्यातील गरीब आदिवासी त्याला भुलले आणि त्यांनी आपल्या मालमत्ता इथं कवडीमोल दरानं विकून टाकल्यात असा आदीवासी समाजातल्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

शेजारच्याच वसईहून विन्सेट डायस नावाचा फादर आपल्या साथीदारांसोबत गेल्या काही वर्षांपासून इथं यायचा. त्याच्या प्रचाराला पहिल्यांदा बळी पडलं ते देवखोपमधील वाढाण कुटुंब. त्यांच्याच जमिनीत 21 एप्रिलचं शिबीर भरलं होतं. त्याच्याच शेतात फादरनं तुम्हाला येशू इस्त्रायलला घेऊन जाईल असं सांगितलं. या वाढाण कुटुंबाने या फादरच्या नादाला लागून आपले दोन ट्रक विकले असा आरोप आदीवासी कार्यकर्त्यांकडून होतोय. पण, हरी वाढाणचा मुलगा आणि सुनेच्या मतेअशी परिस्थिती नाही.

विशेष म्हणजे देवखोपचा हा सगळा प्रकार राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्याच मतदारसंघात झाला आहे. त्यांनीही या प्रकारामागे भू माफियाच असावेत असा संशय व्यक्त केला आहे. राज्यात आदिवासींना फसवून त्यांचं धर्मांतर केलं जातंय असा आरोप एरव्हीही होत असतो. पण, त्यांना कफल्लक करायला लावणारा हा प्रकार मात्र नवीनच आहे. त्यामुळंच, हिप्नॉटिझम चा वापर करून आदिवासींना नडलं गेलंय का याची चौकशी होण्याची गरज आहे.

close