सचिनच्या चाहत्यांच्या गर्दीतला एक मित्र…

April 24, 2011 7:53 AM0 commentsViews: 21

24 एप्रिल

सचिन क्रिकेटचा बादशहा. क्रिकेटमधील आपल्या अफलातून कामगिरीनं सचिननं अवघं जग आपलंस केलं. सिनेस्टार पासून अब्जाधीश उद्योगपतीही त्याचे दोस्त होण्यासाठी धडपडतात. ग्लॅमरस जगात राहुनही क्रिकेटच्या या बादशहाला आपल्या जुन्या दोस्तीचा कधीच विसर पडलेला नाही. सचिनच्या अशाच एका नागपुरकर जुन्या दोस्ताकडून सचिनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेतली सचिनच्या दोस्तीची अनोखी कहाणी.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस म्हणजे देशभरात जणू राष्ट्रीय सणच. या दिवसाची सचिनचे चाहते आतुरतेनं वाट पाहात असतात. पण सचिनच्या या करोडो चाहत्यांमध्ये सर्वात वरचा क्रमांक लागतो तो नागपूरच्या नरेश वाघमोडेचा. आणि याला कारणही तसेच आहे.

नागपूर विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर नव्वदच्या दशकात ग्राऊंडमनचे काम करणारा नरेश वाघमोडे सुरुवातीला ऑटो रिक्षा चालवायचा. अंडर 15 मॅचसाठी नागपूरमध्ये आलेल्या सचिनला स्टेडियमवर सोडण्याची जबाबदारी नरेशवर येऊन पडली. आणि याच दरम्यान नरेश आण सचिन तेंडुलकरची मैत्री घट्ट झाली.

सचिन तेंडुलकरने 1989 साली भारतीय टीममध्ये पदार्पण केलं. आणि नरेशने यावेळी सचिनची भेट घेऊन त्याचे अभिनंदनही केलं. सचिनची ख्याती जगभर पसरु लागली, पण आपल्या मैत्रीत त्याने कधीही दुरावा दिला नाही. वाघमोडे कुटुंब सचिनचा वाढदिवस आजही मोठ्या उत्साहात साजरा करतात.

क्रिकेटच्या मैदानावर सचिन जितका महान आहे, तितकचा मैदानाबाहेरही आणि नरेशबरोबरची ही मैत्री म्हणजे सचिनच्या महानतेचं एक प्रतिक आहे.

close