ज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले यांचं निधन

April 28, 2011 11:38 AM0 commentsViews: 37

28 एप्रिल

ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक नारायण आठवले यांचं आज सकाळी साहित्य सहवास येथील राहत्या घरी निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. सेवादलच्या कामगार युनियनमधून त्यांच्या चळवळीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांचे पीए म्हणून 6 वर्षं काम केलं. त्यांना लेखनाची आवड होती. आठवले यांनी टोपणनावाने 1954 साली पहिली कथा लिहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नानासाहेब गोरेंना अटक झाल्यानंतर समाजवादी चळवळीच्या लेखनाचे काम त्यांनी हाती घेतलं.

त्यानंतर ते लोकमित्रमध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले. 1961 साली ते दैनिक लोकसत्तामध्ये रुजू झाले. लोकसत्तेत असताना भारुड हे त्यांचं सदर खूप गाजलं. लोकसत्तेत त्यांनी सुमारे 25 वर्षं पत्रकारिता केली. त्याचबरोबर त्यांनी स्वत: प्रभंजन आणि परी नावाचे साप्ताहिक चालवले. 10 वर्षं गोमंतकचे संपादक म्हणून काम पाहिले. 1991 ते 2000 या काळात चित्रलेखामधील महाराष्ट्र देशा हे सदर खूप गाजलं. याशिवाय त्यांनी 26 कादंबर्‍या लिहिल्या आहेत.

महात्मा फुलेंवरील प्रभंजन आणि मुंबई गीता काव्यखंड यांसारखी पुस्तक त्यांनी लिहिली. त्यांचं सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतील भान दखलपात्र होतं. गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नातील त्यांचं योगदान मोठ होतं. 1996 साली ते लोकसभेतसुद्धा निवडून गेले होते. आठवले यांचं महाराष्ट्राबरोबर गोव्यातही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य सुरू होत.

गोव्यात मराठी भाषेला कोकणी भाषेबरोबर समांतर दर्जा देण्यामध्ये त्यांचं योगदान होतं. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी आहे. आठवले यांनी पूर्वा नगरकर, अनिरुद्ध पुनर्वसू अशा वेगवेगळ्या टोपणनावाने लेखन केलं. शेवटपर्यंत त्यांच्या लेखणीची धार कायम होती. निर्भिड आणि द्रष्टे पत्रकार म्हणून तर ते प्रसिद्ध होतेच. पण त्याचबरोबर त्यांची सहज भाषाशैलीही लोकप्रिय होती.

दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नारायण आठवलेंना श्रद्धांजली वाहिली. बाळासाहेब ठाकरे म्हणतात,'नारायण आठवले उत्तम वक्ता, लेखक, प्रभावी विचारांचा पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. मी तर त्यांना खंदा शिवसैनिकच म्हणेन. असा आपला स्नेही अचानक गेल्यानं मला अतिशय दुःख होत आहे. अलीकडे ते सर्वच गोष्टींपासून अलिप्त होते. त्यामुळे माझ्याशी फार संपर्क होऊ शकला नाही. आमच्यातला एक जुनाजाणता शिवसैनिक, शिवसेनेचे माजी खासदार, प्रभावी विचारवंत, कडवट मराठी अभिमानी अचानक सोडून गेल्याबद्दल मी माझ्यातर्फे, कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि असंख्य शिवसैनिकांतर्फे प्रणाम करतो…' – बाळासाहेब ठाकरे

close