नवलाई मुंबईच्या स्काय वॉकची

November 9, 2008 5:07 PM0 commentsViews: 11

9 नोव्हेंबर, मुंबईअलका धुपकर मोनोरेल, मेट्रोरेल आणि ठिकठिकाणी उभे राहणारे स्कायवॉक. यामुळे मुंबईचं रूप काही वर्षांत बदलणार आहे. मुंबईत एकूण 53 स्काय वॉक उभे राहणार आहेत. स्कायवॉकचं डिझायनिंग, फॅब्रिकेशन, वेल्डिंग नेमकं कसं केलं जातं, स्कायवॉकचा पाया कसा तयार केला जातो, सध्याच्या रहदारीला अजिबात धक्का न लावता स्कायवॉक कसा उभारला जातो, हे समजून घेणं खूप इंटरेस्टींग आहे. वांद्र्याचा स्काय वॉक हा भारतातला पहिला स्काय वॉक. तो यशस्वी झाल्यानंतर मुंबई, ठाणे, कल्याण आणि भाईंदरमध्ये येत्या वर्षभरात 53 नवीन स्काय वॉक बांधाण्याचा एमएमआरडीएचा प्रस्ताव आहे. भोबे असोसिएटसच्या अतुल यांनी वांद्रा स्काय वॉकच्या इंजिनिअरिंगचं काम केलंय आणि यापुढेही 7 स्काय वॉकचं काम त्यांच्याकडे आहे. स्काय वॉकचं डिझायिनिंग करताना पहिली पायरी असते ती त्याची ड्रॉईंग बनवायची. ही ड्राँईंग फायनल झाली की त्याचं फॅब्रिकेशन सुरू होतं. ग्रँट रोडमध्ये नाना चौकात होणार्‍या एक किलोमीटर लांबीच्या स्काय वॉकचं वेगळेपण म्हणजे तो रिंग स्काय वॉक असेल आणि त्याचं बांधकाम केबलनी केलं जाणार आहे. ' स्काय वॉकवरून चालताना लोकांना असं वाटेल की तरंगत आहेत. कारण इलेव्हेटर पद्धतीचं असं त्याचं संपूर्ण कन्स्ट्रक्शन करण्यात आलंय ', असं भोबे असोसिएटसचे मॅनेजिंग डायरेक्टर अतुल भोबे सांगत होते. वांद्रा स्काय वॉकसाठी 700 टन इतकं स्टील वापरण्यात आलं तर वांद्रा स्काय वॉकच्या एक्स्टेंशनसाठी 900 टन स्टील वापरण्यात येणार आहे. स्काय वॉकसाठीच्या सगळ्या फॅब्रिकेशन आणि वेल्डींगचं काम नेरुळमधल्या दास ऑफशोअरच्या या वर्कशॉपमध्ये केलं जातं आणि साईटवर फक्त त्याच्या असेंब्लिंगचं काम होतं. वांद्र्याला पहिल्यांदाच जेव्हा स्काय वॉक बनवला गेला तेव्हा अण्णा खाडे यांनीच त्याच्या मटेरियल आणि क्वालिटीच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली. 10 हजार चौरस मीटरच्या या जागेवर त्यांच्यासोबत साडेतीन हजार कामगार काम करतात. ' टेन्शन तर होतंच या सगळ्याचं. पण जे काम नॉर्मली आठ महिन्यात झालं असतं ते आम्ही अडीच महिन्यात करुन दिलं ',असं दास ऑफशोअर मॅनेजिंग डायरेक्टर अण्णा खाडे यांनी सांगितलं.स्काय वॉक बांधण्यासाठी जमिनीखाली 15 मीटरपर्यंत पायलिंग केलं जातं. बिल्डींग बांधत असताना त्यासाठी जसे कॉलम उभारले जातात तसाच हा जमिनाखाली पाया तयार केला जातो. मुंबईत जमिनीखाली वेगवेगळ्या 26 प्रकारच्या एजन्सीच्या केबल आणि पाईप लाईन आहेत. त्यामुळे स्काय वॉकचं काम करत असताना त्याला कुठेही धक्का लागणार नाही, याची काळजी घेणं, हे सगळ्यात मोठं आव्हान असतं. पाईपलाईन आणि केबल्सच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत स्काय वॉकचं फाउंडेशन उभं केलं जातं आणि त्यानंतर त्यावर जोडणी केलेला स्काय वॉक पक्का करण्यात येतो. रस्त्यावरुन चालताना ट्रॅफिक आणि गर्दीचा होणारा त्रास टाळण्यासाठी स्काय वॉक ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली. पण आता स्काय वॉकमुळे होणार्‍या विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी स्काय वॉकवर दुकानं बांधण्याचा एमएमआरडीचा विचार आहे. यामुळे स्काय वर मोकळेपणाने चालण्याच्या मूळ संकल्पनेलाच एकतर धक्का बसणार आहे आणि स्काय वॉकच्या खाली रस्त्यावर असलेल्या दुकानदारांचाही यामुळे धंदा कमी होणार आहे. त्यामुळेच स्काय वॉकवरच्या दुकानांवरुन दोन जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. शिवसेना, मनसे या दोन्ही पक्षांनी दादरच्या स्कायवॉकला याच मुद्यावर विरोधही केलाय. पण पुढच्या दहा वर्षाच्या मुंबईच्या विकासामध्येही स्काय वॉकचा विचार करण्यात आलाय. 'मोनोरेल किंवा मेट्रोरेल ज्या असतील त्याच्या स्टेशन्सच्या बाहेरपर्यंत हे स्काय वॉक असतील. म्हणजे रेल्वे स्टेशन्स सगळी एकप्रकारे कनेक्ट केलेली असतील. आता या स्काय वॉकच्या वर्क ऑर्डर निघाल्यात ', असं अतुल भोबे सांगत होते. त्यामुळे पुढच्या दोन महिन्यात ठिकठिकाणी त्याचं काम सुरू झालेलं दिसेल.

close