नाशकात शिल्लक जुड्या लाटण्याच पध्दतीवर बंदी

April 30, 2011 2:12 PM0 commentsViews: 6

30 एप्रिल

भाजीपाल्याच्या शंभर जुड्यांमागे सात जुड्या जास्त घेण्याची पध्दत नाशिक बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू होती. आता ही बेकायदेशीर पध्दत बाजार समितीने बंद केली आहे. त्यामुळे आपलं नुकसान होत असल्याचा ओरडा करत भाजीपाल्याच्या व्यापार्‍यांनी भाजीपाला खरेदीवर बंदी घातली.

बाजार समिती या मुद्यावर ठाम असून शेतकर्‍यांनी नाशिक बाजार समितीत माल न आणता थेट गुजरात किंवा मुंबईला हा माल न्यावा असं आवाहन बाजार समितीनं केलं. व्यापार्‍यांच्या आडबाजीचा भुर्दंड शेतकर्‍यांसह शहरातल्या ग्राहकांनाही बसतोय. सात जुड्यांची बंदी न मानणार्‍या आणि खरेदीवर बहिष्कार टाकणार्‍या 70 व्यापार्‍यांचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश बाजार समितीने दिले आहेत.

तर 7 जुड्या रद्द करण्याच्या निर्णयाचे आता शेतकर्‍यांनी स्वागत केलं आहे. पण व्यापार्‍यांनी लिलावावर घातलेल्या बहिष्कारामुळे त्यांच्या मालाचे नुकसान होतंय. पण शेतकर्‍यांनी जुड्या प्रतवारी करून द्याव्यात अशी व्यापार्‍यांची अट आहे. ही अट मान्य होत नाही तोपर्यंत भाजीपाला लिलावावर बहिष्कार कायम ठेवणार असल्याचे त्यांचं म्हणणं आहे.

तर सिन्नरमध्ये इंडिया बुल्स आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सेझच्या विरोधात नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सेझसाठी भूसंपादन करताना शासनाने कबुल केलेल्या अटी पाळल्या नसल्याच्या या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. तसेच या प्रश्नी गेल्या आठवड्यात निर्माण झालेल्या तणावाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या अत्याचारांचा यावेळी निषेध करण्यात आला.

close