वेबसाईटच्या दुनियेत मराठी झेंडा !

May 1, 2011 1:06 PM0 commentsViews: 16

प्राची कुलकर्णी, पुणे

01 मे

जागतिक स्तरावर आजवर अनेक मराठी तरुणांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. पुण्यातील मंदार जोगळेकर हे ही त्यापैकीच एक. आजच्या तंत्रज्ञान युगात मंदारने काळाची गरज ओळखून आपली पावलं टाकली आणि प्रत्येक पावला-गणिक यशाची पायरी सर केली. मायविश्व डॉट कॉम, ग्लोबल मराठी डॉट कॉम आणि बुकगंगा डॉटकॉमच्या माध्यमातून जगभरातील मराठी लोकांचे एक नवं विश्व त्यांनी साकारले आहे.

कोकण ते अमेरिका व्हाया पुणे हा प्रवास आहे सोशल नेटवर्किंगमध्ये यशस्वी ठरलेल्या एका तरुणाचा. ही कहाणी आहे कोकणातल्या साखरपे या छोट्याशा गावातून आलेल्या मंदार जोगळेकर यांची. या छोट्याशा खेड्यात मंदारनं आपलं 10 वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पण केवळ शिक्षण हे मंदारचं ध्येय नव्हतं.

काहीतरी वेगळं करुन दाखवण्याचा ध्यास त्यांना स्वस्त बसू देत नव्हता. आणि याच ध्यासापोठी ते दाखल झाले विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात. पुढे पुणे हेच मंदार जोगळेकर यांची कर्मभूमी बनले. पण हा प्रवास इतका सोपाही नव्हता. पुण्याच्या आपटे प्रशालेतून त्यांनी आपलं पुढचं शिक्षण सुरु केलं. पण त्यांची खरी ओढ होती ती कॉम्प्युटरकडे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी प्रायव्हेट क्लासमधून कॉम्प्यूटरचा कोर्सही पूर्ण केला.

कॉम्पुटरची आवड आणि काहीतरी नविन करुन दाखवण्यची जिद्‌द बाळगलेल्या मंदार यांना अमेरिकेत काम करण्याची संधी मिळाली. सातासमुद्र पार मंदारच्या जोडीला होतं पुस्तकांविषयीचे वेड आणि माणसं जोडण्याची आवड. पण ही आवड त्यांनी केवळ स्वत:पुरता मर्यादित ठेवली नाही.

जगभरातील मराठी माणसांना याचा कसा फायदा होऊ शकतो याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. आणि यातूनच साकारली मायविश्वची संकल्पना अमेरिकास्थित कंपनीच्या माध्यमातून त्यांनी बुकगंगा डॉट कॉम ही पुस्तकांची वेबसाईट आणि ग्लोबल मराठी डॉट कॉम ही मराठी माणसांना जोडणारी वेबसाईट सुरु केली.

शुन्यातून विश्व उभं करणार्‍या मंदारच्या मायविश्वची संकल्पना चांगलीच रुजली. जगभरातील मराठी माणसं एकमेकांशी जोडली गेली. मराठीतील उत्कृष्ट साहित्य त्यांना वाचालय मिळाले. बघता बघता मायविश्वची व्याप्ती वाढत गेली जबाबदारी अर्थातच वाढली होती. अशात त्यांना गरज होती मणुष्यबळाची. मंदार यांनी आपली टीम तयारी केली. पण ही टीम निवडतानाही त्यांनी एका गोष्टीवर खास लक्ष दिलं. खेड्यापाड्यातून शहरात आपला मार्ग शोधण्यासाठी आलेल्या हुशार मुलांना त्यांनी पहिलं प्राधान्य दिलं.

मनाची जिद्द आणि झेप घेण्याची इच्छा असेल तर परिस्थितीच्या बेड्याही तुम्हाला अडवू शकत नाहीत हेच मंदारनं दाखवून दिलं. आज अमेरिकेसारख्या प्रगत देशात त्यांनी मराठीचा झेंडा फडकत ठेवला आहे. मराठी भाषेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणार्‍या या मराठी तरुणाचा आम्हाला अभिमान आहे.

close