लादेनवर कारवाईत पाक सरकारला अंधारात ठेवले !

May 2, 2011 3:33 PM0 commentsViews: 1

02 मे

ओसामा बिन लादेन विरोधातील कारवाईत पाकिस्तान सरकारला अंधारात ठेवण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. लादेनबाबत गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीची चर्चा अमेरिकेनं पाकिस्तानशी कधीच केली नाही. ओसामाचा ठावठिकाणा कुठं आहे आणि तो पाकिस्तानात कसा आला याबद्दलची काहीच माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.

पाकिस्तानला विश्वासात न घेता अमेरिकेनं केलेल्या या कारवाईविरोधात पाकिस्तान सरकार अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रात अधिकृत निषेध नोंदवणार असल्याच सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर इस्लामाबादमध्ये राष्ट्रपती आसीफ अली झरदारी यांनी आपत्कालीन बैठक बोलावली.

या बैठकीत पंतप्रधान युसुफ रजा गिलानी आणि लष्कर प्रमुख उपस्थित होते. अबोताबाद इथल्या लष्करी मोहिमेबद्दल पाककडून अजून अधिकृत निवेदन करण्यात आलेला नाही. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूसंदर्भात आणि एकदंरच कारवाई बदद्ल परराष्ट्र मंत्रालय अधिकृत निवेदन करणार असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

ओसामा बिन लादेनवर झालेल्या कारवाईवर परवेझ मुशर्रफ म्हणतात, 'लादेनला ठार मारणे हा पाकिस्तानसाठी आणि जगासाठी मोठा विजय आहे. अमेरिकेनं पाकिस्तानच्या हद्दीत येऊन कारवाई करणे हा आमच्या सार्वभौमत्वाचा भंग आहे.त्यामुळे अमेरिकेची ही कारवाई अयोग्य आहे. या कारवाईमध्ये पाकिस्तानला सहभागी करून घ्यायला हवं होतं.'

close