कोळी समाजाचं नदीपात्रात आंदोलन ; 8 जणांची प्रकृती गंभीर

May 2, 2011 2:09 PM0 commentsViews: 51

02 मे

आरक्षणाच्या मुद्दयावरुन सुरू असलेलं कोळी समाजाचे आंदोलन आता चिघळलं आहे. जळगाव जिल्ह्यातील रायपूर गावाजवळील तापी पात्रात सुरु असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. रणरणत्या उन्हात नदीपात्रात उभ्या असलेल्या या आंदोलनकर्त्यांतील 8 महिलांची प्रकृती गंभीर झाली आहे.

रावेर जवळील रायपूर – तारखेडा या गावातून वाहात असलेल्या या तापी नदीच्या पात्रात हे जलसमाधी आंदोलन सुरु आहे. कोळी समाजातील ढोर कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी,मल्हार कोळी या जातींवर सरकार अन्याय करीत असल्याचं या आंदोलनकर्त्यांचे म्हणणं आहे.

जातीचे दाखले देण्याची सरकारी पध्दत सोपी करावी ही सुध्दा यांची मागणी आहे. तब्बल 47 अंश सेल्सीअस तापमानात भर नदीपात्रात ऊभे असल्याने यातील 8 महिलांची तब्येत बिघडली आहे. कालपासून तहसीलदार बबनराव काकडे, उप जिल्हाधिकारी व्हि एम राजगुरु यांनी भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती कोळी परिषदेनं धुडकावून लावली आहे.मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत नदीपात्रातच उभे राहण्याच्या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम आहे.

close