जगदीश खेबूडकर यांचं निधन

May 3, 2011 9:37 AM0 commentsViews: 52

03 मे

ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर यांचं आज दीर्घ आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पिंजरा, साधी माणसं असे अनेक गाजलेले मराठी चित्रपट त्यांच्या गाण्यांमुळे अधिक बहारदार झाले. जगदीश खेबूडकरांच्या दोन्ही किडन्या काम करत नव्हत्या म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तरीही शेवटच्या दिवसापर्यंत ते गीत लिहत होते. तब्बल अडीचं हजाराहून अधिक गीतं त्यांनी लिहिली.

गावरान मेवा, रामदर्शन, लोकरंजन हे त्यांचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरले. व्ही शांताराम, दादा कोंडके, भालजी पेंढारकार अशा दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या लोकप्रिय गाण्यामध्ये "तुम्हावर केली मी मर्जी बहाल", "कुठं कुठं जायचं हनिमूनला", "ही कशानं धुंदी आली", "राजा ललकारी अशी रे" अशी अडीच हजारांहून अधिक गीतं त्यांनी लिहिली. सुमारे 325 चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे. 48 संगीतकारांनी त्यांच्या गीतांना संगीत दिलंय. 36 गायक आणि 36 गायिकांनी खेबूडकर यांची गीतं गायली आहेत. 1960 पासून सातत्याने ते लेखन करत आले.

जगदीश खेबूडकर हे 1960 पासून सातत्यानं लेखन करत होते. खेबूडकर यांना गीतलेखनासाठी 11 राज्य पुरस्कारांसह बालगंधर्व पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, ग. दि. मा. पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं.गण गवळण या चित्रपटात सर्व 19 गाणी खेबूडकरांची होती. दुर्गा आली घरा हे सर्वात मोठं म्हणजे 16 मिनिटांचं गाणं खेबुडकर यांनी लिहिलं आहे.

खेबूडकरांनी बालगीत, प्रेमगीत, नांदी, पोवाडा, भक्तिगीत, किर्तन, स्फूर्तीगीत, देशभक्तीपर गीत, गण, गौळण, वग, लावणी, हादग्याची गाणी, गौरी गीत, झगडा गीत, सवाल-जवाब, कोळी गीत, अस्वलवाला, माकडवाला, नंदीबैलाचे गीत, वासुदेव गीत, भजन, दिंडी अशा अनेक प्रकारात गीतलेखन केलंय.

लिखाणाव्यतिरिक्त गायन, वादनामध्येही त्यांचा हातखंडा होता. कमल हसनच्या हे राम चित्रपटासाठीही त्यांनी लावणी लिहिली होती. लोकरंजन संस्थेच्या माध्यमातून लोककलेसाठी खेबुडकरांनी काम केलं आहे. अभंग थिएटर्स या नाट्यसंस्थेची त्यांनी स्थापना ही केली. त्याच्या माध्यमातून गावरान मेवा या कार्यक्रमाचे 3 हजारांहून अधिक प्रयोग केले आहेत.

जगदीश खेबूडकर यांच्या नावावर गीतलेखनाचे अनेक विक्रम आहेत.

1) 2,500 सर्वाधिक गीत लिहिली 2) 325 चित्रपटांसाठी सर्वाधिक चित्रपटांसाठी गीत लिहिली 3) 48 संगीतकार सर्वाधिक संगीतकारांनी त्यांच्या गीतांना संगीत दिलं 4) 36 गायक आणि 36 गायिका यांनी त्यांच्या गीतांना आवाज दिला 5) चित्रपट गीतं लिहिण्याची प्रदीर्घ कारकीर्द – 1660 ते 2011, 50 वर्षं गीतरचना 6) सर्वाधिक 11 राज्य पुरस्कार गीत रचनेसाठी मिळवले 7) 'गण गवळण' या चित्रपटासाठी सर्वात जास्त 19 गाणी आणि तेही एकाच चित्रपटासाठी8) सर्वात जास्त वेळ चालणारं गाणं – 16 मिनिटं, 120 ओळी, चित्रपट – दुर्गा आली घरा ( गीतात साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन)9) सर्वाधिक ओळींचा वग – 100 ओळी, चित्रपट – एक गाव बारा भानगडी 10) सर्वाधिक दिग्दर्शकांनी खेबुडकरांची गीतं वापरली – 35 दिग्दर्शक 11) गीतलेखनाचे सर्वात जास्त प्रकार वापरले

close