पाक सरकार आता आमचा दुष्मन नंबर एक : तालिबान

May 3, 2011 5:10 PM0 commentsViews: 2

03 मे

ओसामा बिन लादेन मारला गेला पण आता या कारवाईवरच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहे. पाकिस्तानमध्ये आज लादेन समर्थकांनी अमेरिकेविरोधात निदर्शनं केली. दुसरीकडे तालिबानने पाकिस्तानला दुष्मन नंबर एक म्हणून घोषित केलं. आणि तिसरीकडे पाकिस्तान आणि अमेरिकेत निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला. दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तान महत्त्वाची भूमिका निभावतोय, या जुन्या भूमिकेचा अमेरिकेनं पुनरुच्चार केला.

जगातल्या सगळ्यात बडा अतिरेकी मारला गेल्यावर प्रतिक्रिया उमटली नसती तरच नवल. ओसामा बिन लादेनला ठार मारल्याचा निषेध करण्यासाठी. जमाते उलेमाए इस्लाम या संघटनेने पाकिस्तानातल्या क्वेट्टा शहरात निदर्शनं केली. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इथं अमेरिका आणि पाकिस्तान सरकारच्या विरोधात नारे लावले. अमेरिकन जवान लादेनला मारत असताना पाकिस्तान सरकारने त्यांना छुपी मदत केल्याचा दावा करतं. पाकिस्तानी तालिबानने पाकिस्तान सरकारविरुद्धच मोर्चा उघडला आहे. पाकिस्तान सरकार आता आमचा दुष्मन नंबर एक असेल असं संघटनेच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.

पाकिस्तानमधील वातावरण अपेक्षेप्रमाणे अशांत झालेलं पाहून आणि प्रतिहल्ल्याच्या भीतीपोटी अमेरिकेने पाकिस्तानमधील आपले सर्व 4 दूतावास ताबडतोब बंद केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी नागरिकांना अनिश्चित काळासाठी अमेरिकेचा व्हिसा मिळू शकणार नाही.

दरम्यान, ओसामाला ठार मारण्याची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच पाकिस्तान सरकारला या घटनेची माहिती देण्यात आली असं ओबामांचे दहशतवादविरोधी विषयांचे सल्लागार जॉन ब्रेनन यांनी स्पष्ट केलंय. तसेच ओसामाला स्थानिकांची मदत मिळत होती अशी सूचक पुस्तीही त्यांनी जोडली.

पाकिस्तानच्या भूमीवर कारवाई करताना पाकिस्तानलाच अंधारात ठेवल्यामुळे काही पाकिस्तानी राजकारण्यांनी नाराजी व्यक्त केली. ती दूर करण्यासाठी आज अमेरिकेचे आफ -पाक विभागाचे प्रतिनिधी मार्क ग्रॉसमन यांनी इस्लामाबादेत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी भेट घेतली. आणि पाकिस्तान हा दहशतवादविरोधी लढ्यात महत्त्वाचा देश असल्याचा पुनरुच्चार केला. याच बैठकीत तिन्ही देशांनी अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर चर्चा केली. आता ओसामा ठार झाल्यामुळे अमेरिका अफगाणिस्तानमधल्या आपल्या सैन्याला लवकर परत बोलवण्याच्या विचारात आहे.

close