लादेनचा मृतदेह अरबी समुद्रात एका जहाजावर नेण्यात आला होता !

May 3, 2011 4:43 PM0 commentsViews: 6

03 मे

ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह अमेरिकेच्या स्पेशल फोर्सनं हेलिकॉप्टरमधून अफगाणिस्तानातल्या बगराम याठिकाणी नेला. बगराममधून ओसामाचा मृतदेह अमेरिकेच्या अरबी समुद्रातल्या कार्ल विन्सन या जहाजावर नेण्यात आला अशी बातमी द सन या इंग्लंडमधल्या वर्तमानपत्राने दिली.

कार्ल विन्सनवरच्या एका मुस्लीम खलाशानं ओसामाच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी केले. 50 मिनिटं हा विधी चालला. ओसामाचे अशा पद्धतीने दफन करणं इस्लामच्या विरोधात आहे असं काही इस्लामी धर्मगुरुंनी म्हटलंय. त्याच्या दफनाची जागा कट्टरवादी मुस्लिमांचे श्रद्धास्थान बनू नये अशी अमेरिकेची इच्छा होती. त्यामुळेच त्याचे खोल समुद्रात दफन करण्यात आलं. ओसामा जिथं जन्मला त्या सौदी अरेबियाने त्याचा मृतदेह ताब्यात घ्यावा असं आवाहन अमेरिकी सैन्याने केलं होतं. पण सौदी सरकारने ते मान्य केलं नाही.

कुवेती कुरियरमुळे सापडला ओसामा

पाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये लपलेल्या ओसामापर्यंत पोचण्यासाठी एक कुरियर महत्त्वाचं ठरलं. अबू अहमद असं नाव असलेला कुवेतचा हा नागरिक ओसामाच्या सतत संपर्कात होता. या कुरियरची माहिती 2007 मध्ये अमेरिकेला मिळाली होती. तेव्हापासून अमेरिकेची त्याच्यावर सतत नजर होती. अमेरिकेच्या गुप्तचरांनी त्याच्या हालचालींवर नजर ठेवली. आणि अखेर या कुरियरच्या माध्यमातून अमेरिकेचं विशेष दल अल कायदाच्या म्होरक्याचा घरापर्यंत पोचलं.

अल कुवैती हा ओसामाबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत होता. आणि अल-कायदाच्या अंतर्गत वर्तुळात त्याची ऊठ-बस होती, अशीही माहिती आहे. अबोटाबादमध्ये लपलेली व्यक्ती ओसामा आहे. हे त्याच्या आजूबाजूला राहणार्‍यांना कदाचित माहित नसेल. पण त्यांच्यात बातचीत मात्र व्हायची. ओसामाला तीन मुलं होती. आणि त्याने आपल्याला ससे भेट दिले होते असं तिथं राहणार्‍या एका मुलानं सांगितले आहे.

अरब जगतातून ओसामाच्या मृत्यूबद्दल काय प्रतिक्रिया

- इजिप्त सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण, तिथल्या काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिलीय. ओसामाचा मृत्यू झाला असला तरी अल कायदा संपेल का असा प्रश्न त्यांनी विचारला.

- ओसामाच्या मृत्यूचा अल कायदावर मानसिक परिणाम होईल, पण अल कायदाचा धोका संपलेला नाही, अशी प्रतिक्रिया इराकच्या गृहमंत्रालयाच्या एका अधिकार्‍यानं दिली

- ओसामा ठार झाला, हे जागतिक शांततेसाठी खूप चांगलं झालं, अशी प्रतिक्रिया पॅलेस्टाईन सरकारनं दिली.

- 'ही घटना अतिशय महत्त्वाची आहे, कोट्यवधी लोक आता शांततेत झोपतील, असं येमेन सरकारनं म्हटलंय.

- ओसामाच्या मृत्युमुळे राक्षसी प्रवृत्तीचा नाश झाला, असं सौदी अरेबिया सरकारनं म्हटलंय.

close