गतिमंद 19 पैकी 10 मुलींवर बलात्कार !

May 4, 2011 1:36 PM0 commentsViews: 18

04 मे

पनवेलच्या कल्याणी महिला आणि बालक सेवा संस्थेमधील 19 पैकी 10 मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने एक समिती स्थापन केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या प्राध्यापिका डॉ. आशा बाजपेयी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. आज हायकोर्टात याप्रकरणाची सुनावणी होणार आहे. तपासातील मुलींवरच्या अत्याचाराचे काही नवीन मुद्दे आज कोर्टापुढे येणार आहेत.

पनवेलमधील कळंबोली भागातील हे रामचंद्र करंजुले यांचं रोहाऊस. याच दुमजली घरामध्ये ते 19 गतिमंद मुलींची संस्था चालवत होते. या संस्थेच्या अध्यक्षा कल्याणी करंजुले यांच्या नावानेच ही संस्था सुरु होती.

कल्याणी महिला आणि बालसेवा संस्था. इथं चालू असलेल्या गैरप्रकारांबद्दल सगळ्या पहिली कुणकुण लागली ती चाईल्ड प्रोटेक्शन कमिटीला. इथल्या मुलींचा छळ होतोच आणि त्यांचं लैंगिक शोषणही होत असल्याचा प्राथमिक अहवाल त्यांनी सरकारला दिला. आणि नंतर बालकल्याण समितीतर्फे कल्याणी संस्थेची चौकशी झाली. येथील मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिथेचं मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं उघड झालंय.

नवी मुंबईतील पोलीस आयुक्तांकडे याबाबत केलेल्या तक्रारीनंतर तपासाने वेग घेतला. या कल्याणी संस्थेतील इतर मुलींना सुरक्षेच्या दृष्टीने मग कर्जतमधल्या गतिमंद मुलींच्या शासकीय केंद्रामध्ये हलवण्यात आलं आणि कल्याणी बालसेवा संस्था पोलिसांनी ताब्यात घेऊन सीलबंद केलं.

या प्रकरणात आज चीफ जस्टीस मोहित शहा तसेच न्या. चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पनवेलप्रमाणेच ठाण्यातील कवडसा गावात एका बालगृहामध्ये असाच प्रकार घडला होता. हे प्रकरणही तपासासाठी पनवेल प्रकरणाचा तपास करणार्‍या सहाय्यक पोलीस आयुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे सोपवण्यात आलं. या दोन्ही प्रकरणाचा तपास विशेष पथकाद्वारे करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या पथकाच्या प्रमुख रश्मी करंदीकर असतील.

close