राखीव भूखंड बोगस संस्थेव्दारे बळकावण्याचा प्रयत्न

May 5, 2011 2:32 PM0 commentsViews: 12

05 मे

मुंबईतल्या वांद्र्याचा अत्यंत महत्वाच्या ठिकाणी स्पोर्ट्ससाठी राखीव असलेला भूखंड बोगस संस्था स्थापन करुन बळकावण्याचा प्रयत्न आकृती बिल्डरने केला आहे. हा प्रकार उघडकीला आल्यानंतरही या बिल्डरवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तर या सर्व प्रकरणात ठाकरे परिवाराशी जवळीक असलेले रवी दोडी हे मध्यस्थ असल्याने ठाकरे परिवाराकडे आता संशयानं पाहिलं जात आहे.

वांद्रे येथील वीस हजार चौरस फुटांचा भुखंड हा फेब्रुवारी 2004 मध्ये माजी क्रिकेटपटु संदीप पाटील आणि डायना एडल्जी यांच्या संस्थेला क्रिकेट अकादमीसाठी देण्यात आला आणि तोही फक्त 98 हजार 104 रुपये वार्षिक भाडेपट्टी दराने. बाजारात या भुखंडाची किंमत आहे जवळपास 800 कोटींच्या घरात. आता मात्र या जागेचा ताबा आकृती बिल्डरचे मालक विमल शहा यांच्याकडे आहे. पण या संदर्भात ऍडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी जनहित याचिक दाखल केली आहे.

आकृती बिल्डरने बोगस एकादमी स्थापन करुन ही जागा बळकावली. संदीप पाटील यांच्या ट्रस्टकडे असलेला भुखंड नंतर मात्र रवी दोडी आणि आकृती बिल्डरचे मालक विमल शहा यांच्या पत्नी लता शहा यांच्या ट्रस्टकडे सोपवण्यात आला. त्यामुळे रवी दोडी यांनी शिवसेनेच्या मध्यस्थीने हा प्लॉट बळकावला अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

संदीप पाटील यांच्या संस्थेला दिलेला प्लॉट नंतर रवी दोडी यांच्या संस्थेला देण्यात आला. रवी दोडी हे ठाकरे कुटुंबाच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळे आकृती बिल्डरला प्लॉट देण्यात यांचाच सहभाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जातेय.

पण रवी दोडीला आपणं ओळखत नसुन ट्रस्टच्या सदस्यांना नोटीस देऊन चौकशी करत असल्याचे जिल्हाधिकारी निर्मलकुमार देशमुख यांनी स्पष्ट केलंय. पण या संपूर्ण प्रकरणासंदर्भात माजी क्रिकेटपटु संदीप पाटील यांच्याशी संपर्क केला असता यावर त्यांनी मौन बाळगण पसंत केलं. पण राजकीय ताकदीच्या जोरावर बिल्डरने बळकावलेला भूखंड आता पुन्हा खेळासाठी उपलब्ध होणार की राजकीय ताकदीच्या जोरावर आकृती बिल्डर हा भूखंड बळकावणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

close