शिवसेना नगरसेवकांच्या वेठीस !

May 5, 2011 12:29 PM0 commentsViews: 11

विनोद तळेकर, मुंबई

05 मे

शिवसेनेत सध्या अनेक मुद्यांवरून अंतर्गत अस्वस्थता आहे. ती जशी आमदार आणि नेत्यांच्या पातळीवर आहे तशीच ती नगरसेवकांच्या पातळीवरसुद्धा आहे. त्याचाच फायदा उचलत नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या विविध समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनी नाराज असल्याचा माहौल तयार करत आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आहे.

राजकीय पक्ष म्हटला की, पक्षांतर्गत शह काटशहाचं किंवा दबावाचं राजकारण ही तर आता स्वाभाविक गोष्ट झाली आहे. आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पक्षातील नेते आपापसात असं दबावाचं राजकारण करत असतात आणि सध्या हे राजकारण सुरु आहे शिवसेनेमध्ये. नगरसेवकांमार्फत दबावनिती सुरु आहे आणि या दबावाला बळी ठरलेत ते खुद्द उद्धव ठाकरे.

काही दिवसांपूर्वी प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणार नाही अशी पुडी सोडून देत बांद्रा पश्चिमचे शिवसेनेचे नगरसेवक मोहन लोकेगावकर यांनी स्थापत्य समिती ( उपनगरे) च्या अध्यक्षपदावर आपली वर्णी लावून घेतली. मग रमेश कोरगावकर यांनीसुद्धा हाच मार्ग अवलंबून बाजार आणि उद्यान समितीचे अध्यक्षपद मिळवलं.

तर त्याआधी होळीच्या मुहूर्तावर शिक्षण समितीन मिळाल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे नगरसेवक राजा चौघुले पुुन्हा मनसेच्या वाटेवर अशी चर्चा सुरू झाली. या दरम्यान चार दिवस तर चौघुले 'नॉट रिचेबल' सुद्धा होते. चौघुलेंचा हा दबाव कामी आला आणि त्यांना विधी समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं.

महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मनसेसारख्या पक्षांच आव्हान असेलच पण त्याचबरोबर या अशा दबावाच्या राजकारणालाही तोंड द्यावं लागणार आहे. तिकिट मिळत नाही म्हणून अनेक नाराज मनसेची वाट धरु शकतात. अशा नाराजाना मनसे उमेदवारी देईल का हा झाला पुढचा प्रश्न पण शिवसेनेचं काही प्रमाणात का होईना नुकसान होईलच. या दुहेरी कात्रीतून सुटण्यासाठी उद्धव ठाकरेंना अर्थातच कल्पकतेनं पावलं टाकावी लागतील.

close