गरज पडली तर पाकच्या भूमीवर आणखी हल्ले करू : अमेरिका

May 5, 2011 5:06 PM0 commentsViews: 8

05 मे

ओसामावरून अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध आज आणखी ताणले गेले. पाकिस्तानने अतिरेक्यांवर कारवाई केली नाही, तर आम्ही यापुढेही लष्करी कारवाई करू असं आज अमेरिकेने ठणकावून सांगितलं. लष्कराच्या दबावाखाली येऊन मग पाकिस्तान सरकारनंही यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान आणि अमेरिकेच्या या वादात पाकिस्ताननं भारतावरही निशाणा साधला.

ऑपरेशन जेरोनिमो संपलंय. पण आता नव्या युद्धाला तोंड फुटलंय. शब्दांच्या युद्धाला. आणि त्यात अमेरिका आणि पाकिस्तानसोबत भारतही गुरफटला गेला आहे. पाकिस्तानी लष्करातल्या सर्व वरिष्ठ अधिका-यांसोबत सल्लामसलत केल्यानंतर जनरल कियानींनी पाकिस्तान सरकारला कडक भूमिका घ्यायला भाग पाडलं. म्हणूनच आम्ही पाकिस्तानी भूमीवर पुन्हा कारवाई करू शकतो', या अमेरिकेच्या वक्तव्याला पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलं.

ओसामावर केलेली कारवाई पूर्णतः कायदेशीर होती. गरज पडली तर आम्ही पुन्हा पाकिस्तानी हद्दीत जाऊन अतिरेक्यांवर कारवाई करू असं राष्ट्राध्यक्ष ओबामांनी आधीच स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सलमान बशीर म्हणतात, या कारवाईमुळे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचा भंग झालाय. यामुळे कायदा आणि नैतिकतेशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण होतायत.

अमेरिकेप्रमाणेच पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन कारवाई करण्याची आमचीही क्षमता आहे या भारतीय सैन्याकडून आलेल्या वक्तव्याची पाकिस्तानने गंभीर दखल घेतली आहे. जर सीमेपलीकडून असं अविचारी कृत्य झालं, तर त्याचे परिणाम संहारक असतील.

बशीर यांनी आएसआयची पाठराखण करत दावा केला की या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अल कायदाशी कुठलाही संबंध नाही. पण त्यांच्या या विधानावर अमेरिकन काँग्रेसमध्ये कुणी विश्वास ठेवला नाही. ओसामाला पाकिस्तानने कुठलीही मदत केली नाही, हे जोवर पाकिस्तान सिद्ध करत नाही, तोवर या देशाला मिळणारी आर्थिक मदत बंद करावी अशा आशयाचे विधेयक गुरुवारी अमेरिकन काँग्रेसमध्ये दाखल करण्यात आलंय.

close