मोहन जोशींनी निर्लज्जपणाचा कळस गाठला !

May 6, 2011 11:37 AM0 commentsViews: 19

06 मे

अजूनपर्यत राजीनामा न देऊन मोहन जोशी यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठलाय अशी प्रतिक्रिया नाट्यनिर्माता दिलीप जाधव यांनी दिली. दरम्यान नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मोहन जोशींनी आयबीएन लोकमतवर केली होती.

मात्र बुधवार रात्रीपासून त्यांचा फोन बंद आहे. नाट्यपरिषदेच्या ऑफिसमध्येही यासंदर्भात काहीही माहिती नाही. दरम्यान, अशोक पाटोळे, योगेश सोमण तसेच इतर नाटयकमीर्ंनी स्मिता तळवळकर यांच्याकडे मोहन जोशी यांनी राजीनामा द्यावा अशा मागणीचं पत्र सोपवलेलं आहे.

नाशिकजवळ शुटींगच्यावेळी दारु पिऊन धिंगाणा घातल्याने गावकर्‍यांनी जोशी आणि त्यांच्यासह असलेला अभिनेता चेतन दळवी यांना बेदम चोप दिला होता अशा बातम्या होत्या. याप्रकरणी मोहन जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन माफीही मागितली. जो प्रकार घडला तो ठीक नव्हता असही त्यांनी स्पष्ट केलं. आणि पवारांनी राजीनामा मागितला तर देऊ असं ते म्हणाले होते.

पण नाट्य परिषदेचे सदस्य त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर आयबीएन-लोकमतवर त्यांनी राजीनामा देणार अशी घोषणा केली. पण त्यावेळेपासून ते बेपत्ता आहेत. ते मढमध्ये शूटिंगसाठी गेल्याचं जोशी यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. पण आमचे रिपोर्टर तिथं गेले असता ते त्याठिकाणीही सापडले नाहीत. आता या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची 8 मे रोजी बैठक आहे.

close