मोहन जोशींचा अखेर राजीनामा

May 6, 2011 2:11 PM0 commentsViews: 2

06 मे

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी अखेर राजीनामा दिला आहे. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मोहन जोशींनी बुधवारी आमच्या प्राईम टाईम बुलेटीन या कार्यक्रमात केली होती. या कार्यक्रमानंतर मोहन जोशींचा फोन बंद होता. आपण गुरूवारी राजीनामा देणार असं सांगणारे मोहन जोशी मात्र गुरूवारी बेपत्ता झाले होते. आज अचानक मोहन जोशी नाट्य परिषदेच्या कार्यकारी बैठकीला अवतरले आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.पण जोपर्यंत नवीन अध्यक्षाची निवड होत नाही तोपर्यंत नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष हेमंत टकले अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील.

मोहन जोशी यांचा राजीनामा नाटयपरिषदेनं स्वीकारला आहे. तसेच मोहन जोशी यांच्यावर शिस्तपालन समिती नेमण्यात आली असून मोहन जोशी यांची चौकशी करण्यात येणार आहे. या समितीला तीन महिन्यात आपला अहवाल देणार आहे. या शिस्तपालन समितीत स्मिता तळवलकर, हेमंत टकले आणि जयप्रकाश जातेगावकर यांचा समावेश असणार आहे.

नाशिकजवळ शुटींगच्यावेळी दारु पिऊन धिंगाणा घातल्याने गावकर्‍यांनी जोशी आणि त्यांच्यासह असलेला अभिनेता चेतन दळवी यांना बेदम चोप दिला होता अशा बातम्या होत्या. याप्रकरणी मोहन जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन माफीही मागितली. जो प्रकार घडला तो ठीक नव्हता असही त्यांनी स्पष्ट केलं. आणि पवारांनी राजीनामा मागितला तर देऊ असं ते म्हणाले होते. पण नाट्य परिषदेचे सदस्य त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर आयबीएन-लोकमतवर त्यांनी राजीनामा देणार अशी घोषणा केली.

पण त्यावेळेपासून ते बेपत्ता होते. ते मढमध्ये शूटिंगसाठी गेल्याचं जोशी यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. पण आमचे रिपोर्टर तिथं गेले असता ते त्याठिकाणीही सापडले नाहीत. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची 8 मे रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत मोहन जोशी राजीनामा देतील अशी शक्यता होती. पण आज मोहन जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

close