लादेनचा मृत्यू अल कायदाला मान्य ; बदला घेण्याची धमकी

May 6, 2011 5:17 PM0 commentsViews: 7

06 मे

ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्याचं अखेर अल कायदाने मान्य केलंय. वेबसाईटवर अल कायदाने याबाबतचं निवेदन आज प्रसिद्ध केलं. इस्लामी वेबसाईचं मॉनिटरींग करणार्‍या साईट इंटेलिजन्स ग्रुपनं ही माहिती दिली. अल कायदाने आपल्या निवेदनात ओसामाचे कौतुक केलंय. आणि अमेरिकेवर सूड उगवण्याची धमकी दिली. तसेच पाकिस्तानच्या नागरिकांना बंड करण्याचे आवाहन केलंय.

अल कायदाचा संदेश

'लादेनचा मृत्यू म्हणजे अमेरिका आणि तिच्या एजंटना शाप आहे. त्यांचा आनंद लवकरच दुःखात बदलेल. त्यांना एके दिवशी रडावं लागेल. काही झालं तरी अल कायदा जिहादचा मार्ग सोडणार नाही. आमच्या आणि आमच्या शत्रूंमधल्या युद्धात अल्लाच सत्याचा निवाडा करेल. ही लढाई जिंकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आमचे सैनिक न थकता, शरण न जाता आणि हार न मानता हे युद्ध सुरूच ठेवतील.'

9/11 सारख्या एक हल्ल्याचा कट

अमेरिकेवर आणखी हल्ले करण्याचा कट अल कायदाने रचला होता अशी माहिती समोर आलीय. त्यात रेल्वे स्थानक उडवण्याच्या कटाचाही समावेश होता. ओसामा बिन लादेनच्या कॉम्प्यूटरमधून ही माहिती मिळालीय. अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने आता रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट जारी केला आहे.

ओसामाला ठार केल्यानंतर अमेरिकन कमांडोजनी त्याच्या घरातून कॉम्प्यूटर, हार्ड ड्राईव्ह्‌ज आणि थंब ड्राईव्ह्‌ज जप्त केलेत. त्यात खूप महत्त्वाची माहिती असल्याचं समजतंय. प्राथमिक तपासात अल कायद्याच्या दहशतवादी हल्ल्यांच्या योजनेची माहिती मिळालीय. 9/11 सारख्या विमान हल्ल्याप्रमाणे रेल्वे हल्ला करण्याची अल कायदाची योजना होती.

महत्त्वाच्या शहरांतील रेल्वे रुळावरून घसरवणं आणि जास्तीत जास्त जीवितहानी करणं, असा हा कट होता. त्यावर फेब्रुवारी 2010 मध्ये चर्चा झाली होती. पण तो अमलात आला नाही. स्फोटकांचा वापर न करता रेल्वे घसरवून नुकसान घडवण्याची ही नवी योजना होती.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गुरुवारी रात्र न्यूयॉर्कमधील ग्राऊंड झिरोला भेट दिली. 9 सप्टेंबर 2001 ला या ठिकाणीच अल-कायदाने वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्वीन टॉवर्स उद्धवस्त केले होते. या हल्ल्यात बळी पडलेल्यांचे नातेवाईकही यावेळी याठिकाणी उपस्थित होते. ओबामा यांनी ग्राऊंड झिरोवर आदरांजली वाहिल्यानंतर त्यांची भेट घेतली.

close