लादेन 10 वर्ष लपला बायकांच्या पदराआड

May 6, 2011 5:54 PM0 commentsViews: 30

06 मे

जगातला सर्वात खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेननने 10 वर्षांचा काळ लपून-छपून घालवला. पण यावेळी त्याच्यासोबत होत्या त्याच्या 5 बायका. त्यापैकी सर्वात लहान आणि लाडकी बायको ओसामाच्या मृत्यूवेळी त्याच्यासोबत होती.

अमेरिकेच्या नेव्ही सिल्सनं जेव्हा ओसामाच्या अबोटामधल्या घरावर हल्ला चढवला, त्यावेळी ओसामा आपल्या कुटुंबियांसोबत होता. त्याची सर्वात लहान पत्नी अमाल अल सदाह त्याच्यासोबत होती. ती येमनची नागरिक आहे. वयाच्या 17 व्या वर्षी तिचं ओसामाशी लग्न झालं. बदल्यात ओसामाने तिच्या आईवडिलांना पाच हजार डॉलर दिले. आता ती 29 वर्षांची आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार हल्ल्यावेळी ती ओसामा आणि कमांडोजच्या मध्ये आली.

'बिन लादेनची पत्नी अमेरिकी सैनिकांच्या पुढे धावली. आणि तिच्या पायाला गोळी लागली.' जीओ टीव्हीच्या दाव्यानूसार ओसामाच्या घराभोवतीच्या कम्पाऊंडजवळ एक पासपोर्ट सापडला. पण तो अमलचाच आहे का, हे मात्र स्पष्ट नाही. याच घरात आणखी एक महिला ठार झाली. ती ओसामाची आणखी एक पत्नी असावी असा सीएनएनचे पत्रकार पॉल क्रूकशँक यांचा संशय आहे. 'बिन लादेनला आपल्या पत्नी सोबत हव्या असत. जर या घरात तो अनेक वर्षं राहत होता तर मग आपल्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी आपल्या पत्नीही सोबत असाव्यात, अशी त्याची इच्छा असावी.'

सीएनएनचे नॅशनल सिक्युरिटी ऍनालिस्ट पीटर बर्गेन यांनी लिहिलेल्या 'द ओसामा बिन लादेन आय नो' या पुस्तकासाठी पॉल क्रूकशँक यांनी संशोधन केलंय. त्यात ओसामाच्या पाच पत्नींबद्दलचे अनेक तपशील आहेत. ओसामाची पहिल्या पत्नीचं नाव आहे. नजवा गानम, ओसामाची सख्खी चुलत बहीण. ती अल्पवयीन असतानाच तिचं ओसामाशी लग्न झालं. कुटुंबीयांत तिची ओळख घाबरट, प्रामाणिक आणि कट्टर धार्मिक वृत्तीची अशी आहे.

ओसामाची दुसर्‍या पत्नीचं नाव आहे उम अली. ती सौदी अरेबियाची नागरिक आहे. लग्नानंतर आपलं जीवन खडतर बनलंय अशी तक्रार तिनं केल्यानंतर ओसामाने तिला घटस्फोट दिला. आणखी एक पत्नी उम खालीद ही ओसामाच्या सहकार्‍याची बहीण आहे. धार्मिक कायद्यांमध्ये तिने उच्च शिक्षण घेतलंय. तर चौथी पत्नी उम हम्जा ही अरबी भाषेत पदवीधर आहे. ओसामाची सर्वात लहान पत्नी म्हणजे अमाल अल सदाह जी शेवटपर्यंत ओसामासोबत होती.

पॉल क्रूकशँक म्हणतात, 'बिन लादेनच्या पत्नी एकमेकींना ओळखायच्या, कौटुंबिक कार्यक्रमात भाग घ्यायच्या आणि त्या ओसामाशी एकनिष्ठ होत्या. त्या अफगाणिस्तानात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचं समजतंय. त्यांना ओसामा कधीतरी भेटायचा.'

ओसामाला या पत्नींपासून 23 मुलं-मुली आहेत. त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्याशी यापैकी कितीजण संपर्कात होत्या याबद्दलची माहिती ओसामाच्या जीवनासारखीच गूढ आहे.

close