कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत पुणे महापालिकेचं काम सुरूच

May 9, 2011 3:37 PM0 commentsViews: 1

प्राची कुलकर्णी , पुणे

09 मे

पुण्याच्या नदीपात्रात चॅनलायजेशन आणि इतर कामांना स्थगिती देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. पण हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत पुणे महानगरपालिकेने मात्र ही कामं सुरुच ठेवली आहेत. तर दुसरीकडे ही कामं पूर्ण झाली नाहीत तर येत्या पावसाळ्यात पुणेकरांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल असा दावा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातल्या रामनदी आणि देवनदीमध्ये असलेल्या राडारोडा आणि अतिक्रमणांच्या प्रश्न चांगलाच गाजतोय. मात्र यावर महापालिका काहीच कारवाई करत नसल्याने बाणेर एरिया सभा आणि जलबिरादरी या सामाजिक संस्थांनी हायकोर्टात दावा दाखल केला.

त्यानंतर हायकोर्टाने पुण्यातल्या नदीपात्रात सुरु असलेली सगळी कामं बंद करण्याचा आदेश दिला. पण या आदेशानंतरही पुणे महापालिकेनं ही कामं सुरुच ठेवली असल्याचा दावा जलबिरादरी संस्थेनं केला आहे. हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे पुणे महापालिकेच्या महापौरांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. पण त्यांचा हा दावा फोल असल्याचंच यामुळे स्पष्ट झालंय.

तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी मात्र हा निर्णयच चुकीचा असल्याचा दावा करत सुरु असलेल्या कामांचे समर्थन केलं आहे. महापालिकेच्या वकीलांनी कोर्टात बाजू नीट न मांडल्याने हायकोर्टाने स्थगिती दिल्याचा आरोप भाजपच्या विकास मठकरींनी केला. आता हायकोर्ट काय अंतिम आदेश देणार याकडेच सगळ्याचे लक्ष लागलंय.

close