त्याच्या संपूर्ण चेहर्‍यावर झाली यशस्वी प्लास्टिक सर्जरी

May 11, 2011 1:01 PM0 commentsViews: 24

11 मे

अमेरिकेत पहिल्यांदाच एका व्यक्तीच्या संपूर्ण चेहर्‍यावर प्लास्टिक सर्जरी यशस्वी झाली. दोन वर्षांपूर्वी पेंटर डल्लास विन याचा संपूर्ण चेहरा भाजला होता. आता तो सर्जरीनंतर काल पहिल्यांदा लोकांसमोर आला.

पेंटर डल्लास विन्स याचा चेहरा जन्मतः असा नव्हता. दोन वर्षांपूर्वी वीजेच्या धक्क्यामुळे त्याचा चेहरा पूर्णपणे भाजला. पण डल्लास नशीबवान ठरला. त्याला आता नवा चेहरा मिळाला आहे. आणि चेहर्‍याचे पूर्ण ट्रान्सप्लांट होणारा तो पहिलाच माणूस ठरला आहे. या महागड्या प्लॅस्टीक सर्जरीचा सर्व खर्च अमेरिकेच्या लष्कराने केला आहे.

याबद्दल डल्लास विन्स म्हणतो की, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी या हॉस्पिटलचा वास घेऊ शकतो. आणि तुम्ही कल्पना करू शकणार नाही, हा वास खूपच चांगला आहे. तब्बल 15 तास ही सर्जरी चालली. या सर्जरीमुळे डल्लासला अज्ञात दात्याकडून नवं नाक, ओठ, त्वचा, स्नायू आणि नस मिळाल्या. अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याचं डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतंय.

प्लास्टिक सर्जन डॉ. बोहडॅन पोमॅक म्हणतात,"खरंच, पुढच्या सहा ते नऊ महिन्यात गंमत पाहायला मिळेल. जेव्हा चेहर्‍याचे कार्य पुन्हा सुरू होईल आणि डल्लासला चेहर्‍याच्या संवेदना समजू शकतील.' डल्लासला नवं जीवन मिळालंय. तो सुंदर आहे असं त्याच्या मुलीच म्हणणं आहे. एका वडिलांची अपेक्षा यापेक्षा अधिक काय असू शकते.?

close