राहुल गांधींच आंदोलन ड्रामेबाजी – मायावती

May 12, 2011 9:30 AM0 commentsViews: 9

12 मे

उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनात राहुल गांधींनी उडी घेतल्यानंतर आता उत्तरप्रदेशचे राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेसच्या पाठोपाठ भाजपनंही मायावतींना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत. तर आंदोलन दडपण्यासाठी मायावती सरकारने पकडसत्र सुरू केलंय. मुख्यमंत्री मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी आणि विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या युवराजांनी ड्रामेबाजी बंद करावी असं मायावतींनी म्हटलंय.

उत्तर प्रदेशातल्या भट्टा पारसौल गावात बुधवारी रात्री नाट्य घडलं. शेतकरी उत्तर प्रदेश प्रशासनाशी भिडले. आणि काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्या राजकीय करिअरमधला हा क्षण मैलाचा दगड ठरला. काँग्रेसच्या स्टार कॅम्पेनरला अटक झाली. नंतर त्यांची सुटकाही झाली. त्यांच्या सुटकेनंतर 12 तासांनी मायावती यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला.

पण राहुल गांधींच्या अटकेचा मुद्दा उचलून धरून काँग्रेसने आंदोलन पेटवत ठेवण्याचे संकेत दिलेत. राहुल यांच्या अटकेचा निषेध म्हणून काँग्रेसनं उत्तर प्रदेशात बंद पुकारला. आणि काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते राहुल यांच्या पाठिंब्यासाठी धावून आले.

दुसरीकडे या आंदोलनात भाजपनंही उडी घेतली. भाजपचे नेते राजनाथ सिंग आणि अरुण जेटली यांनी गाझियाबादमध्ये 24 तासांचे उपोषण पुकारलं. त्यांना नंतर ताब्यात घेण्यात आलं. मायावती यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही हल्लाबोल केला.

राजनाथ, राहुल आणि मुलायम या तिन्ही नेत्यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे हत्यार वापरून उत्तर प्रदेशातली व्होटबँक काबीज करण्यासाठी जोर लावला आहे. एकाचवेळी झालेल्या विरोधकांचा हा हल्ला मायावती कसा परतवून लावतात आणि ज्यांच्यासाठी हे आंदोलन सुरू आहे, त्या शेतकर्‍यांचे काय हे प्रश्न महत्त्वाचे आहेत.

दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने शेतकर्‍यांशी चर्चा करावी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने भूसंपादन कायदा लवकरात लवकर मंजूर करून घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. तर नोएडाजवळच्या ज्या भट्टा-पारसौल गावातून हे आंदोलन सुरू झालं, तिथले लोक आता घाबरलेत. राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या अटकेनंतर आता त्यांना उत्तर प्रदेश सरकारच्या कारवाईची भीती वाटतेय.

close