शिवसेना, भाजप, आरपीआय एकत्र

May 12, 2011 9:54 AM0 commentsViews: 10

12 मे

'जनतेच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत' अशी घोषणा गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांनी आज मुंबईत केली. मात्र ही आमची निवडणुकीसाठीची युती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. शिवशक्ती – भीमशक्ती जनतेच्या प्रश्नांवर लढण्यासाठी एकत्र येणार हे काही दिवसांपूर्वीच रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं होतं.

आता भ्रष्टाचार, महागाई या मुद्यांवर सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी सेना-भाजपच्यासोबत आरपीयआही असेल असं आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले. युतीच्या जनआंदोलनाचा भाग म्हणून 9 जूनला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. तर ही युती काळाची गरज असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात या युतीची अधिकृत घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. आम्ही काँग्रेसची साथ सोडली असं आठवले यांनी स्पष्ट केलं.

शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार का हे ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट होईल असं रामदास आठवले यांनी मातोश्रीवर जाहीर केलं होतं. तसेच महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावर राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्याची घोषणा रामदास आठवले यांनी शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत केली होती. त्यानंतर हे आंदोलन सुरू करण्यासंदर्भात आज आठवलेंनी रंगशारदा इथं एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेही उपस्थित होते.

close