आसाममध्ये काँग्रेसची विजयाची हॅट्ट्रिक

May 13, 2011 5:50 PM0 commentsViews: 6

13 मे

तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये काँग्रेसनं सलग तिसर्‍यांदा विजय मिळवला आहे. आसाम गण परिषद आणि भाजपचा धुव्वा उडायला आहे. भाजपनं 121 जागा लढवल्या होत्या. पण त्यांना फक्त 4 जागांवर समाधान मानावं लागलं.

गेल्यावेळेपेक्षा त्यांना सहा जागांचा तोटा झाला आहे. पण, ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटीक फ्रंट म्हणजेच एआययूडीएफनं भाजप आणि आसाम गण परिषदेला मागे सारत 17 जागा पटकावल्या आहे. विकास आणि शांततेची हमी देत काँग्रेसनं आसाममधली सत्ता सलग तिसर्‍या वर्षी राखण्यात यश मिळवलंय. पण यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे.

2006 मध्ये दुसर्‍यांदा सत्तेवर येताना काँग्रेसला बोडोलँड पीपल्स फ्रंटला सोबत घ्यावं लागलं होतं. पण मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केलेल्या कामांचा फायदा काँग्रेसला झाला. 75 वर्षांचे गोगोई सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहे.

विरोधी पक्षातली आघाडीच यंदा फुटलीय. त्यामुळे त्यांच्या मतांचा टक्काही घसरला. व्होटिंग मशीनमध्ये काँग्रेसने फेरफार केल्यामुळेच आमचा पराभव झाल्याचा आरोप आसाम गण परिषदेचे नेते प्रफुल्लकुमार महंतो यांनी केला.

दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या महंतो यांचा समगुडीत पराभव झाला. तर बरहामपूरमधली जागा मात्र त्यांनी राखली. तसेच आसाम गण परिषदेचे माजी अध्यक्ष वंृदावन गोस्वामी यांचा तेजपूरमधून पराभव झाला.

इतर महत्त्वाच्या नेत्यांमध्ये आसाम गण परिषदेचे अध्यक्ष चंद्रमोहन पटवारी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रणजित दत्त यांचा पराभव झाला.

दुसरीकडे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली. उल्फासह राज्यातल्या अनेक अतिरेकी संघटनांना चर्चेच्या टेबलवर आणणं, शांतता आणि आर्थिक स्थिरता राखण्यात गोगोई यशस्वी झाल्यामुळे जनतेनं काँग्रेसवर पुन्हा विश्वास टाकला.

प्रशासन आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर गोगोई यशस्वी झाले आहे. सलग सहावेळा खासदार राहिलेल्या गोगोई यांनी 17 मे 2001 रोजी आसाम गण परिषदेला बाजूला सारत पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता ते तिसर्‍यांदा शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

close